सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : शासनाच्या नियमांनुसार व नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेल्या सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी या शतक महोत्सवी शाळेचे सेवािनवृत्त प्राचार्य स्वामीराव पांडुरंग हिरोळीकर सर यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती सोहळा रविवारी (दि. १ फेब्रुवारी २०२६) रोजी विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पदग्रहण समारंभ संपन्न झाला. यावेळी रामकृष्ण इंगळे यांनी नूतन प्राचार्य म्हणून, तर प्रसन्न देशपांडे यांनी उपमुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर सेवापूर्ती सोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन तसेच कै. काकासाहेब सुलाखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अनंत कवठाळे होते.
यावेळी वक्त्यांनी आपल्या मनोगतातून शतक महोत्सवी शाळेचे सेवािनवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर सर यांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत व आदर्श सेवाकाळाचा गौरव केला. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले असंख्य विद्यार्थी आज समाजातील विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी स्वामीराव हिरोळीकर सर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. समारोपप्रसंगी त्यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्व सहकारी, विद्यार्थी, संस्था पदाधिकारी व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे व सचिव अनंत कवठाळे यांना अर्पण करत त्यांनी संस्थेचा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावना व्यक्त केल्या. गौरी रसाळ, डॉ. कैवल्य गायकवाड तसेच इतर माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच स्वामीराव हिरोळीकर सर यांचे बंधू रविंद्र हिरोळीकर यांनी परदेशातून पाठवलेला त्यांच्या कार्याचे कौतुक करणारा व्हॉइस रेकॉर्ड कार्यक्रमात सादर करण्यात आला. विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांत व शिस्तबद्ध वातावरणात तब्बल तीन तास अठरा मिनिटे अखंडपणे पार पडला.
दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी स्वामीराव हिरोळीकर सर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या नेतृत्वकाळात सुलाखे विद्यालयाचा सर्वांगीण कायापालट होऊन शाळेची गुणवत्ता व प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.
या सेवापूर्ती सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश गुंड, बानपा शिक्षण प्रशासन अधिकारी भारत बावकर, बार्शी नगरपालिकेचे शिक्षण समितीचे सभापती भारत पवार, संस्थेचे संचालक श्रीपाद मनगोलीकर, डॉ. हृषिकेश हिरोळीकर (न्युरो सुपर स्पेशालिस्ट), जयश्री हिरोळीकर, तसेच नूतन प्राचार्य रामकृष्ण इंगळे, उपमुख्याध्यापक प्रसन्न देशपांडे, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. पी. कदम यांनी प्रभावी व संयत शैलीत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना रामचंद्र इकारे यांनी उद्देश स्पष्ट करणाऱ्या नेमक्या शब्दांत मांडली. कार्यक्रमाच्या शेवटी सुहास देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.















