म्हाडा येथील नवीन वेठबिगाराचा प्रकार उजेडात, शेतकऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तरुणांना काम देण्याचे आमिष दाखवून गावात नेले जाते. तेथे त्यांना डांबून ठेवून मारहाण करून ऊसतोडणी करून घेतली जाते. वेठबिगारीची ही नवी पद्धत उजेडात आली आहे. पुण्यातील एका तरुणाला म्हाडा येथील शेतात नेऊन कोणतेही पैसे न देता महिनाभर पहाटेपासून रात्री १० वाजेपर्यंत ऊसतोडणी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत अमित अशोक दळवी (वय ३३, रा. एव्हिंग स्काय वॉटर सोसायटी, वाघोली) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अप्पा तांबे, अक्षय तांबे, शुभम (रा. मु. पो. नाडी, ता. म्हाडा, जि. सोलापूर) यांच्यावर अपहरण, दुखापत तसेच बेकायदेशीर सक्तीची मजुरी या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील नाडी येथे २४ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. २३ डिसेंबर रोजी रात्री त्यांनी उशिरा अरोरा टॉवर येथे डिलिव्हरी दिली. त्यानंतर ते पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरबाहेर झोपले होते.
२४ डिसेंबर रोजी सकाळी उठल्यावर त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. ते दिवसभर स्टेशन परिसरात फिरत होते. रात्री एका व्यक्तीने अमित दळवी यांना काम पाहिजे का, असे विचारले. त्यांनी होकार दिल्यावर पुण्याजवळ शेतात काम असून एक हजार रुपये रोज मजुरी असल्याचे सांगितले.
त्यानंतर रात्री ११ वाजता पुणे स्टेशनवरून आणखी दोन-तीन जणांसह त्यांना एका कारमध्ये बसवण्यात आले. पहाटे ३ वाजता सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी त्यांना उतरवण्यात आले. तेथून मालवाहू वाहनातून त्यांना म्हाडा येथील अप्पा तांबे यांच्या घराजवळील एका खोलीत ठेवण्यात आले. त्यांच्याकडून ऊसतोडणीचे काम करून घेण्यात आले.
ऊसतोडणीचे काम अत्यंत कष्टाचे असल्याने अमित दळवी यांच्याकडून ते काम होत नव्हते. अप्पा तांबे हे त्यांना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कामासाठी उठवत होते. रात्री १० वाजेपर्यंत त्यांच्या इच्छेविरुद्ध ऊसतोडणीचे काम करून घेत होते.
काम करण्यास नकार दिल्यास अप्पा तांबे, अक्षय तांबे व शुभम नावाची व्यक्ती त्यांना केबलच्या वायरने व बांबूने मारहाण करून जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडत होते. काम झाल्यावर त्यांना खोलीत कोंडून ठेवले जात होते. तसेच कामाचा मोबदला म्हणून एक रुपयाही देण्यात आला नाही.
२९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता त्यांनी नजर चुकवून शेतातून चालत मुख्य रस्त्यावर येत सुटका करून घेतली. तेथून कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. एका व्यक्तीच्या मोबाईलवरून वडिलांशी संपर्क साधला. रेल्वेने पुणे स्टेशनला आल्यानंतर ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.
अनेक तरुणांना डांबून करून घेतले जात आहे काम म्हाडा येथील अप्पा तांबे यांच्या शेतात फिर्यादीसह आणखी काही तरुणांना डांबून ठेवून काम करून घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरील एजंटांकडून अशा तरुणांना हेरून गावाकडे पाठवले जात आहे. त्यांना कोणताही मोबदला दिला जात नसल्याचे या तरुणाने सांगितले आहे. वेठबिगारीचा हा नवा प्रकार समोर आला आहे.















