सीमाशुल्क विभागाची पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई : एक प्रवासी अटकेत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणार्या एका प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने पकडले. प्रवाशाकडून २ कोटी २९ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. बँकॉकहून इंडिगोच्या विमानाने पुणे विमानतळावर उतरलेल्या या प्रवाशाने आपल्या सामानात गांजा लपविला होता.
८ डिसेंबर रोजी बँकॉकहून आलेल्या विमानातून एक प्रवासी उतरला. तो घाईघाईने विमानतळाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे कस्टम पथकातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत हायड्रोपोनिक गांजा आढळला. त्याच्याकडून २ हजार २९९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अशा प्रकारच्या गांजाला मोठी किंमत मिळते.
पुणे विमानतळावर प्रवाशाकडून जप्त केलेल्या या गांजाची किंमत २ कोटी २९ लाख रुपये असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली.















