अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना पकडून साडेबारा लाखांचा मेफेड्रॉन जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खराडी येथील ईओन आयटी पार्क गेट क्रमांक २ जवळ पहाटेच्या सुमारास संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोघांची अंमली पदार्थ विरोधी पथकाने झडती घेतली. त्यांच्याकडून १२ लाख ४१ हजार रुपयांचा २७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आला आहे.
मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. धोका बिल्डिंग, लोहगाव रोड, वाघोली, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि हरीश सुजनाराम देवासी (वय २२, रा. बायफ रोड, वाघोली, मूळ रा. बाडमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राजपुरोहित हा गेल्या १० वर्षांपासून पुण्यात राहत असून त्याचे गिफ्ट शॉपचे दुकान आहे. देवासी हा गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात असून त्याचे मोबाईल शॉप आहे. दुकान चालवित असतानाच ते अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे आढळून आले.
अंमली पदार्थ विरोधी पथक पुणे शहरातील विविध भागांत पेट्रोलिंग करीत पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खराडी येथील ईओन आयटी पार्क फेज २ मागील गेटजवळ आले. तेथे दोघे जण संशयास्पदरीत्या थांबलेले दिसून आले. संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यांच्याकडे २७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आढळून आला. दोघांविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनील महाडिक, गणेश गोसावी, संदीप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर तसेच खराडी पोलीस ठाण्याकडील कॉप्स २४ चे मार्शल पोलीस अंमलदार पगारे व जाधव यांनी केली आहे.















