पुणे : रुग्णाच्या निधनानंतर हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या आठ जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
याबाबत रुग्णालयातील अधिकारी अभिजित अंकुश शिवणकर (वय ४२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय केरु सपकाळ, शुभम संजय सपकाळ, कुणाल हनुमंत सकपाळ, गौरव गणेश सकपाळ, विश्वजीत कुंडलिक कुमावत, मंगेश दत्तात्रय सपकाळ, वैभव हनुमंत सपकाळ आणि विनायक अजय सपकाळ (सर्व रा. उद्योगनगर, महंमदवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये, मालमत्तेची हानी किंवा नुकसान) प्रतिबंधक कायदा–२०१० मधील कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचे शहरप्रमुख अजय सपकाळ यांचे वडील केरु सपकाळ (वय ७६) यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची २८ नोव्हेंबर रोजी अल्सरची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर दोन दिवसांत ते सुधारलेही होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि बुधवारी त्यांचे निधन झाले. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप सपकाळ कुटुंबीयांनी केला. या घटनेनंतर सपकाळ यांचा मुलगा संतप्त झाला आणि त्याने इतर आरोपींना चिथावणी देऊन रुग्णालयात तोडफोड केली. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शिवणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार तपास करत आहेत.















