पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई व गोवा येथे छापेमारी करून पावणे चार कोटींचा अंमली पदार्थ जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खडकी येथे गांजाची विक्री करताना पकडलेल्या आरोपीकडून गांजाचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत असताना, पोलिसांना आपल्याजवळच म्हणजे पिंपरी येथे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये चक्क हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची शेती केली जात असल्याचे आढळून आले. पुणे पोलिसांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई व गोवा येथे छापेमारी करून पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून पावणे चार कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसेच विविध बँक खात्यांमधील, क्रिप्टो वॉलेटमधील व विदेशी चलनातील एकूण ७ लाख ८० हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.
तुषार चेतन वर्मा (वय २१, रा. दिल्ली, सध्या सुसगाव), सुमित संतोष डेडवाल (वय २५, रा. मधुबन कॉलनी, जुनी सांगवी, मूळ रा. गंगापूर, संभाजीनगर), अक्षय सुखलाल महेर (वय २५, रा. एक्सर्बिया टाऊनशिप, हिंजवडी, मूळ रा. गंगापूर, संभाजीनगर), मलय राजेश डेलिवाला (वय २८, रा. अमृतनगर सर्कल, घाटकोपर पश्चिम, मुंबई) आणि स्वराज अनंत भोसले (वय २८, रा. कुर्ला, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी माहिती दिली. खडकी पोलिसांना पेट्रोलिंगदरम्यान तुषार चेतन वर्मा हा संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याच्याकडून १ किलो १९४ ग्रॅम गांजा व इलेक्ट्रॉनिक काटा जप्त करून एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तुषार वर्मा याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सुमित डेडवाल आणि अक्षय महेर यांच्याकडून अंमली पदार्थ आणत असल्याची माहिती दिली. त्यानुसार सुमित संतोष डेडवाल आणि अक्षय महेर यांना सांगवी येथून ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी स्वतः चौकशी करून महत्त्वाची माहिती उघडकीस आणली.
या आरोपींनी पिंपरी-चिंचवडमधील दाट वस्तीच्या भागात एक फ्लॅट भाड्याने घेऊन त्यामध्ये सॉईल-बेस्ड हायड्रोपोनिक ‘ओजी कुश’ गांजाची शेती उभारल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही गांजाची शेती उद्ध्वस्त करून प्लांटसाठी वापरलेले साहित्य, रोपे व तयार माल जप्त केला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबई व गोवा येथे छापे टाकण्यात आले.
या कारवाईत मलय राजेश डेलिवाला हा महत्त्वाचा आरोपी ताब्यात घेण्यात आला. त्याच्याकडून नऊ प्रकारचे अंमली पदार्थ—गांजा ओजी कुश, गांजा, चरस, एमडी, सायकॅटिक मशरूम, एलएसडी पेपर, कॅनॅबिस गमीज, एमडीएमए पिल्स आणि सीबीडी ऑईल—मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. तसेच या अवैध व्यवसायासाठी वापरण्यात येणारे वजन काटे, नोटा मोजण्याची मशीन, सीलबंद करण्यासाठीच्या बॅगा व इतर साहित्यही जप्त करण्यात आले.
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, आरोपींचे देशांतर्गत व परदेशातील पेडलर नेटवर्कला पुरवठा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी थेट संबंध आहेत. यासाठी त्यांनी हवाला व क्रिप्टो करन्सी ट्रान्झॅक्शनचा वापर केला होता. त्यांच्या संपूर्ण गुन्हेगारी नेटवर्कचा माग काढण्याचे काम तपास अधिकारी करत आहेत.
ही संपूर्ण मोहीम पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलीस निरीक्षक किरण गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक मुदस्सर पटेल यांच्या सहकार्याने ही कारवाई पार पडली.
पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने फॉरेन्सिक टीमच्या सहकार्याने निर्णायक भूमिका बजावली. तसेच बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस अंमलदार भोरे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नाईक, पोलीस अंमलदार जाधव, दिनेश मरकड, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस अंमलदार विराज शिंदे (साहारा पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व त्यांचे सहकारी तसेच खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनीही महत्त्वाचे योगदान दिले आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन अलकनिरंजन’
या प्रकरणातील मुख्य आरोपीने डार्क वेबवर आपली ओळख लपविण्यासाठी संपर्कासाठी ‘अलकनिरंजन’ हे नाव वापरले होते. त्यावरून पोलिसांनी या कारवाईला ‘ऑपरेशन अलकनिरंजन’ असे नाव दिले. या मोहिमेत एकूण सुमारे ३ कोटी ४५ लाख रुपयांचा अंमली पदार्थ व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, राज्यस्तरीय, आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय वितरण साखळी स्पष्टपणे उघड झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी पिंपरीमध्ये नियंत्रित वातावरणात हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची शेती करत होते. तसेच, गेल्या काही दिवसांत पोलिसांनी अंमली पदार्थांशी संबंधित सहा गुन्हे दाखल करून त्यामध्ये मेफेड्रॉन, अफू, ओजी कुश (हायड्रोपोनिक) गांजा असा एकूण १ कोटी ६ लाख ७८ हजार २०० रुपयांचा, १ किलो ४३७ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला आहे.















