अमेरिकेतून मुले आल्याने करणार होते वाटणी : देखभाल करणाऱ्या ४ महिलांवर संशय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अमेरिकेत मुलांकडे दोन वर्षे राहिल्यानंतर मुलासह पुण्यात आलेल्या वयोवृद्ध आईची आपले सोनेनाणे तिघा मुलांमध्ये वाटणी करण्याची इच्छा होती. त्यामुळे मुलाने बँकेच्या लॉकरमधून ५८ लाखांहून अधिक किमतीचे सोने व हिरेजडित दागिने काढून घरातील कपाटात ठेवले होते. ते दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. ८२ वर्षांच्या आईची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या चार महिलांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. अनिल रामचंद्र गुप्ता (वय ६१, रा. कुमार प्रिन्स टाउन, रॉयल, उंड्री) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सॅलीसबरी पार्क येथील गिडनी पार्कमधील पूजा अपार्टमेंटमध्ये ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी आरती, कविता, दिपाली आणि मनिषा या वेगवेगळ्या काळात त्यांच्या घरी कामाला असलेल्या महिलांवर संशयित म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल गुप्ता हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे दोन भाऊ अमेरिकेत राहतात. त्यांची आई सुनिता गुप्ता (वय ८२) या मागील दोन वर्षांपासून अमेरिकेत राहात होत्या.
१९ जून २०२५ रोजी त्या भारतात परत आल्या. सॅलीसबरी पार्कमधील फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहतात. त्यांची देखभाल करण्यासाठी सरीता एजन्सीमार्फत आरती ही नेपाळी महिला १० जून २०२५ पासून त्यांच्याकडे नोकरीला होती.
दोन्ही भाऊ भारतात आले असल्याने सुनिता गुप्ता यांची इच्छा होती की त्यांच्याकडील सर्व सोनेनाणे हे तीन भावांमध्ये वाटून द्यावे. दिवाळीपूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांनी बँकेच्या लॉकरमधून हे दागिने आणून सॅलीसबरी पार्कमधील फ्लॅटच्या कपाटात ठेवले.
कपाट लॉक करून त्याची चावी त्यांनी आईकडे दिली. काही कारणास्तव हे दागिने तीन भावांमध्ये वाटून देणे राहिले. नंतर आईने हे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने पुन्हा लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले होते; मात्र अनवधानाने ते लॉकरमध्ये ठेवणे राहून गेले.
त्यांच्याकडे कामाला असलेली नेपाळी महिला १८ ऑक्टोबर रोजी अचानक आजीची तब्येत ठीक नसल्याचे सांगून नेपाळला निघून गेली. त्यानंतर खुशी एजन्सीतून १९ ऑक्टोबर २०२५ पासून कविता या महिलेला आईच्या देखभालीसाठी नोकरीला ठेवण्यात आले.
मात्र घरात पाय घसरून पडल्याने तिच्या पायाला दुखापत झाली आणि २५ ऑक्टोबर २०२५ रोजी तिने काम सोडले. त्यानंतर खुशी एजन्सीकडून दिपाली या महिलेला नोकरीवर ठेवण्यात आले; परंतु तिचे आणि आईचे पटले नाही.
ती काम व्यवस्थित करत नसल्यामुळे ५ नोव्हेंबर २०२५ रोजी तिला कामावरून काढून टाकण्यात आले. ५ नोव्हेंबर २०२५ पासून मनिषा ही महिला त्यांच्याकडे कामाला येत आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी कपाट उघडले असता त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत.
त्यांच्या घरात कामाला असलेल्या या चार महिलांशिवाय कोणीही आलेले नाही. कपाटाची चावी त्यांची आई नेहमी उशीखाली ठेवत असते. या दागिन्यांमध्ये १८ तोळ्यांच्या सोन्याच्या १२ बांगड्या, २४ तोळ्यांचे सोन्याचे ३ नेकलेस, ५ तोळ्यांचे सोन्याचे ५ जोड कानातले — असे एकूण ४८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, तसेच खरेदीच्या वेळी १ लाख रुपये किमतीचा हिऱ्यांचा नेकलेस असा किमान ५८ लाख रुपयांचा (सध्याच्या किमतीनुसार) ऐवज चोरीला गेला आहे.
ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान आईच्या देखभालीसाठी चार महिला नोकरीवर होत्या. या चार महिलांपैकी कोणीतरी हे दागिने चोरले असावेत, असा संशय डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.















