रॉंग साईडने जाणाऱ्या १२३० जणांवर एकाच दिवशी कारवाई : ५ लाखांचा दंड वसूल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. १८ डिसेंबर रोजी रॉंग साईडने येणाऱ्या १२३० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ५ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात दररोज किमान एक हजार वाहनांची भर पडत आहे. मात्र, रस्ते मात्र कित्येक वर्षांपासून तेवढेच आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लहान-मोठ्या सर्वच रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसून येते.
त्यातच वाहतूक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहने येत असल्यास वाहतुकीचा वेग कमी होऊन जागोजागी कोंडी होते. हे लक्षात घेऊन रॉंग साईडने वाहन चालविणारे तसेच ट्रिपल सीट वाहनचालकांविरुद्ध गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली.
या मोहिमेत ट्रिपल सीट असलेल्या ३२८ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. तसेच रॉंग साईडने वाहन चालविणारे १२३० वाहनचालक पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून एकूण ५ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर अचानक नाकाबंदी करून १४ मद्यपी वाहनचालकांवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अपघाताचा धोका वाढतो. नियमांचे काटेकोर पालन केल्यास शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित राहते.
त्यामुळे सर्व वाहनचालकांनी, विशेषतः रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.















