मूल्यधिष्ठित शिक्षणातून जबाबदार नागरिक घडवण्याचा सूर्योदय : डॉ. संजय चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : केवळ पदवी संपादन करणे म्हणजे खरे शिक्षण नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्कांचा सन्मान राखणे आणि भारतीय संविधानाप्रती निष्ठा ठेवणे, हाच शिक्षणाचा खरा गाभा असल्याचे प्रतिपादन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
सूर्यदत्त लॉ कॉलेज (SLC) आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (SIHS), कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क’ या विषयावरील विशेष परिसंवादात ते बोलत होते.
संवैधानिक तरतुदी आणि लोकशाहीचे बळकटीकरण- या सत्रात प्रमुख वक्ते विजयदीप मुंजणकर यांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचे महत्त्व सखोलपणे विशद केले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी अनुच्छेद १४ (कायद्यासमोर समानता) आणि अनुच्छेद १५ (भेदभावास प्रतिबंध) या मूलभूत अधिकारांचा पाया कसा रचला गेला, यावर प्रकाश टाकला.
तसेच, अनुच्छेद २९ आणि ३० अंतर्गत अल्पसंख्याक समुदायांना मिळालेले सांस्कृतिक जतन आणि स्वतःच्या शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार हे केवळ सवलती नसून लोकशाहीच्या बळकटीकरणाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी विविध न्यायालयीन निवाड्यांचे (Judicial Precedents) दाखले देत कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली. विद्यार्थी विकास आणि जागतिक दृष्टिकोन – सूर्यदत्त ग्रुपच्या ए.व्ही.पी. स्नेहल नवलखा यांनी नमूद केले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होते, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर प्रगल्भ नेतृत्व म्हणून सिद्ध होण्यास मदत होईल.
फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सीमी रेथरेकर, लॉ कॉलेजच्या प्राचार्या केतकी बापट आणि प्राध्यापिका डॉ. मोनिका सेहरावत यांनी संस्थेच्या मूल्यधिष्ठित शिक्षण पद्धतीवर भर दिला. यावेळी आर्यन मुसळे, वरद भैरवकर आणि सारा जाधव या विद्यार्थ्यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. केवळ शैक्षणिक माहिती देणे हा यामागचा हेतू नसून, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, मानवी हक्क आणि समाजातील प्रत्येक घटकाप्रती आदराची वृत्ती जोपासणे, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि नैतिक जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. सर्व मुलांनी कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रभावी पद्धतीने साकारल्याबद्दल प्रा. डॉ. संजय बी. चोरडियांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी असेही प्रोत्साहन दिले की मुलांनी समाजहितासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम करत राहावे.
सूर्यदत्त संस्थेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी, मग तो वकील असो वा डॉक्टर, त्याने जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीची सेवा करावी हीच आमची भूमिका आहे. युवकांना विविधतेचा सन्मान, परस्पर आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचे महत्त्व पटवून देणे ही आजच्या काळाची गरज आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
















