महाराष्ट्र न्युज नेटवर्क
शिरूर : भगवान श्री शिवशंकरांच्या कृपाशीर्वादाने आणि भक्तीभावाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात शिरूर येथे भव्य “श्री शिव महापुराण कथा” आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक पर्वात हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत.
या पवित्र कथावाचनाचा शुभयोग आंतरराष्ट्रीय कथा वाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वासी) यांच्या अमृतवाणीतून लाभणार आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीने शिवमहापुराणातील दिव्य प्रसंग, शिवतत्त्वज्ञान, भक्तीमार्ग, तसेच जीवनातील सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या प्रेरणादायी कथा भक्तांना ऐकण्यास मिळणार आहेत.
ही श्री शिव महापुराण कथा मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 ते रविवार दिनांक 2 मार्च 2026 या कालावधीत दररोज सायंकाळी दुपारी 1.00 ते 4.00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पी. आर. धारिवाल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून, या भव्य धार्मिक सोहळ्याचे प्रायोजकत्व माणिकचंद (Prakash R. Dhariwal) यांचे लाभले आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रामलिंग रोड, शिरूर (घोडनदी) येथे करण्यात आले असून, या पवित्र कथेसाठी शिरूर परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
आयोजकांनी सर्व शिवभक्तांना आवाहन केले आहे की, “सर्व विघ्नहर, सर्व मंगलमय अशा या धार्मिक सोहळ्यासाठी आपण सहपरिवार उपस्थित राहावे आणि शिवमहापुराण कथामृताचा लाभ घ्यावा.”
या भव्य आयोजनासाठी धारिवाल परिवार – सौ. दिना धारिवाल, प्रकाश धारिवाल, आदित्य धारिवाल यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. शिवकृपा, भक्तीभाव आणि अध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
















