उद्योजकांचे आभार; उद्योग-शिक्षण समन्वय ही काळाची गरज : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित युगात विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वासाठी सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि कौशल्यसंपन्न बनवणे ही सूर्यदत्त शिक्षण समूहाची मूलभूत भूमिका असून, या उद्देशातून सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीने विद्यार्थ्यांसाठी विशेष औद्योगिक भेटीचे आयोजन केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थ केअर अँड रिसर्च (SCPHR) तर्फे प्रथम वर्ष बी. फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी एमआयडीसी येथील न्यूलाईफ फार्मास्युटिकल्स (NuLife Pharmaceuticals) या WHO-GMP प्रमाणित औषधनिर्माण प्रकल्पास औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली होती.
या भेटीत विद्यार्थ्यांनी टॅब्लेट, कॅप्सूल, लिक्विड ओरल्स तसेच आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया, अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे संचालन, कडक गुणवत्ता नियंत्रण नियम यांचा प्रत्यक्ष अभ्यास केला. कच्च्या मालाचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, उत्पादनातील अचूकता, प्रगत तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्यांचा समन्वय त्यांनी जवळून अनुभवला.
पॅकेजिंगमधील सुरक्षितता, अचूक लेबलिंग, गुणवत्ता नियंत्रण (QC) व गुणवत्ता हमी (QA) प्रक्रियेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजले. यामुळे औषधनिर्मिती ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नसून ती शिस्त, अचूकता व सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.
हा उपक्रम त्यांच्या “Future-ready education” या शैक्षणिक दृष्टिकोनाचा प्रत्यक्ष आविष्कार असून, विद्यार्थ्यांसाठी तो अत्यंत मार्गदर्शक ठरला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडलीच, शिवाय त्यांचा आत्मविश्वासही दुणावला.
या शैक्षणिक उपक्रमाचे नियोजन डॉ. सारिका झांबड आणि श्री. प्रसन्न पाटील यांनी केले. तसेच श्री. गणेश एस. मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अशा नाविन्यपूर्ण, उद्योगाभिमुख उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन, कार्यसंस्कृती, जबाबदारीची भावना आणि नैतिक मूल्ये सातत्याने रुजवली जात असून, हीच शिक्षणपद्धती सूर्यदत्त समूहाला इतर संस्थांपेक्षा वेगळे आणि अग्रगण्य स्थान प्राप्त करून देत आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात स्टार्टअप उपक्रम आणि उद्योग-शिक्षण यांच्यातील मजबूत सेतू हीच काळाची गरज आहे.सूर्यदत्तमध्ये वर्कशॉप्स आणि औद्योगिक प्रशिक्षणाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज करीत आहोत. प्रत्यक्ष अनुभवाची संधी देणाऱ्या सर्व उद्योगांचे आम्ही मनापासून आभार मानतो. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन



















