राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद ५.० ची प्रेरणादायी सांगता
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनात उल्लेखनीय कामगिरी करणारा शास्त्रज्ञ, एक पाय नसतानाही आत्मविश्वासाने मॉडेलिंग करणारा प्रेरणादायी युवक, शेताच्या बांधावरून कोट्यवधींचा व्यवसाय उभारणारा युवा उद्योजक आणि कुस्तीच्या मैदानात आंतरराष्ट्रीय क्षितीजावर मर्दुमकी गाजवून देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा खाकी वर्दीतील जिगरबाज अधिकारी… असे एकापेक्षा एक ‘रिअल हिरो’ युवकांसमोर आले आणि त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद ५.० च्या निमित्ताने ‘रिअल हिरोज’ हे विशेष सत्र पार पडले. या सत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व सहाय्यक पोलिस उपायुक्त राहुल आवारे, ‘हॅब बायोमास’ या स्टार्टअपचे संचालक कृणाल जगताप आणि युवकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व हर्षदकुमार वारघडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
“आयुष्यात एखादा जिव्हारी लागणारा अपमानच पुढे टर्निंग पॉइंट ठरतो. त्या अपमानातूनच काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते,” अशी भावना या सर्व रोलमॉडेल्सनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार पराग पोतदार, राहुल मोकाशी आणि प्रतिक टिपणीस यांनी या मान्यवरांशी संवाद साधला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे १४ वे वंशज वृषालीराजे भोसले, पीएसआय स्वरूपा नायकवडे आणि रिट संस्थेचे श्रीधर नाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. साताऱ्यातील मायणी गावातील जिल्हा परिषद शाळेपासून ऑक्सफर्डपर्यंतचा प्रवास उलगडताना डॉ. नानासाहेब थोरात म्हणाले, “एका जर्मन व्यक्तीने माझा सीव्ही पाहून ज्या संस्थांत मी शिकलो त्यांना जगात स्थान नाही असे सांगत अपमान केला.
त्याच क्षणी जगातील पहिल्या पाच विद्यापीठांत शिकायचे ठरवले. त्या जिद्दीमुळे शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्डमध्ये पोहोचलो. उंचावर जाणे सोपे असते; मात्र तिथे टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अपयश कितीही आले तरी टिकून राहण्याची क्षमता महत्त्वाची आहे.”
ते पुढे म्हणाले, “ज्या दिवशी तुम्हाला आई-वडिलांची आणि स्वतःची परिस्थिती बदलावीशी वाटते, तीच खरी प्रेरणा असते. आजाराचे निदान आपल्या आतच असते, ती म्हणजे इम्युनिटी. ती प्रेरणा जपली तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते.”
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व सहाय्यक पोलिस उपायुक्त राहुल आवारे म्हणाले, “घरात कुस्तीचे वातावरण असल्याने लहानपणापासूनच प्रेरणा मिळाली. गुरू सांगायचे, ध्येयासाठी वेडे व्हावे लागते. अनेक अपयशांनंतरही जो प्रयत्न करत राहतो, तोच खरा यशस्वी ठरतो. यश एका झटक्यात मिळत नाही; सातत्य आणि टिकून राहणे गरजेचे असते.”
हर्षदकुमार वारघडे म्हणाले, “वयाच्या सहाव्या वर्षी अपघात झाला आणि एक पाय काढावा लागला. पण मी कधीही दुःख चेहऱ्यावर येऊ दिले नाही. नकारात्मकतेत अडकून राहिलो तर पुढे कसे जाणार? दृष्टी बदला, जग बदलेल. मी माझ्या कमजोरीला ताकद बनवली. जिद्दीने उभा राहिलो.
प्रोत्साहन दिले तर माणूस आपल्या क्षमतेपेक्षा जास्त करू शकतो, हे मला अनुभवातून कळले. आयुष्यात आई-वडिलांपेक्षा मोठे मोटिवेशन दुसरे नाही. तुमच्यातील कौशल्य वाढवा, वेळेचा सदुपयोग करा आणि प्रत्येक क्षण जगा.”
कृणाल जगताप म्हणाले, “अभियंता होऊन किमान २५ हजार रुपये कमवायचे एवढेच स्वप्न होते. पण पहिलीच नोकरी १२ लाख पॅकेजची मिळाली. तरी ते काम आवडले नाही म्हणून नोकरी सोडली. गांडूळ खताची कल्पना सुचली आणि वर्मी कम्पोस्टच्या माध्यमातून परदेशात व्यवसाय सुरू केला. यातून एक गोष्ट शिकलो पैसा फक्त कष्टातून नाही तर कल्पनेतूनही मिळतो. स्वतःशी प्रामाणिक राहा, नीतिमूल्ये जपा आणि बदलत्या काळाशी जुळवून घ्या.”
कार्यक्रमाच्या शेवटी हर्षदकुमार वारघडे यांनी ‘झिंगाट’ या गाण्यावर सादर केलेले नृत्य उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करणारे ठरले. एक पाय नसतानाही साधलेले संतुलन आणि चेहऱ्यावरचा आनंद अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरला. अशाच उत्साही आणि प्रेरक वातावरणात राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद ५.० ची सांगता झाली.
















