प्रेमसंबंधावरून लहान भावाने तरुणाच्या डोक्यात वार करून केला होता खून : आंबेगाव पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बहिणीसमवेतच्या प्रेमसंबंधाच्या रागातून तिच्या लहान भावाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर गावाला पळून गेलेल्या दोघांना आंबेगाव पोलिसांनी नांदेडहून जेरबंद केले आहे.
संदीप रंगराव भुरके (वय २५) आणि त्याचा मित्र ओमप्रसाद ऊर्फ दत्ता गणेश किरकन (वय २०, दोघेही रा. चिखलवाडी, प्रफुल्लनगर, ता. भोकर, जि. नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जावेद खादमियाँ पठाण (वय ३४, रा. गुरुदत्त वॉशिंग सेंटर, गायमुख चौक, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना २२ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजता घडली होती. संदीप भुरके हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो, तर ओमप्रसाद किरकन हा सध्या कोणतेही काम करत नाही. जावेद पठाण याचे संदीप भुरके याच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध होते. ही बाब तिच्या आई-वडिलांना व भावाला माहिती होती.
जावेद हा नुकताच गावी जाऊन आला होता. २२ डिसेंबर रोजी जावेद हा वॉशिंग सेंटरमध्ये गाड्यांची साफसफाई करत असताना संदीप व ओमप्रसाद तेथे आले. त्यांनी प्रेमसंबंधाचा राग मनात धरून जावेदच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केले व ते पळून गेले. जावेद याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
खून करणाऱ्या आरोपींबाबत अधिक माहिती घेतली असता ते जावेदच्या शेजारी राहणारे असून मूळ गावी भोकर येथे गेल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश जमदाडे, हरीश गायकवाड हे नांदेड येथे रवाना झाले.
नांदेड पोलिसांच्या मदतीने नांदेड व भोकर परिसरात शोध घेऊन संदीप भुरके व ओमप्रसाद किरकन यांना पकडून पुण्यात आणण्यात आले. न्यायालयाने त्यांना १ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे यांनी केली आहे.















