अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत सूर्यदत्तकडून दहा कलाकारांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे मानधन जाहीर
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : कला आणि संस्कृती हा शिक्षणाचाच एक अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात केले. मराठी नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दहा कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मराठी कलाकारांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात कला व परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या प्रसंगी सूर्यदत्ततर्फे उपस्थित सर्व कलाकारांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले व त्यांच्या मराठी नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कला-संवर्धनाची जाणीव मनात ठेवून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने नेहमीच कलाक्षेत्राला मान-सन्मान देत त्याला सक्षम आधार देण्याची परंपरा जपली आहे. शिक्षणासोबतच कला, संस्कृती, नेतृत्व, समाजसेवा व मूल्याधिष्ठित उपक्रमांचे एकत्रीकरण हे सूर्यदत्तच्या सर्वांगीण शिक्षणपद्धतीचे केंद्रबिंदू असल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
त्यांच्या दूरदृष्टीमुळे सूर्यदत्त आज २६ विविध शाखांद्वारे विद्यार्थ्यांना बहुआयामी शिक्षण देणारी आघाडीची संस्था ठरली आहे. परफॉर्मिंग आर्ट्ससारख्या अभ्यासक्रमांद्वारे अभिनय, नाट्यकला, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
याच सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकीचा पुढचा टप्पा म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेच्या विशेष कार्यक्रमात मराठी रंगभूमीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दहा कलाकारांना प्रत्येकी १०,००० रुपये मानधन देऊन गौरविण्यात आले.
हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न राहता कलाकारांचा संघर्ष, निष्ठा व त्यांच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाचा सन्मान करणारा ठरला. लेखिका-दिग्दर्शिका सौ. उर्मिला म्हगे यांनी “कला हीच खरी सेवा आहे” असे भावस्पर्शी मत व्यक्त करत कलाकारांच्या संघर्षावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात कथाकथन, नाट्यसंवाद, संगीत व अभिनयाच्या विविध सादरीकरणांमुळे प्रेक्षकांना समृद्ध सांस्कृतिक अनुभव मिळाला. कलाकारांनी सूर्यदत्तकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, अशा उपक्रमांमुळे समाजातील सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत मांडले.
सूर्यदत्तचा हा उपक्रम महाराष्ट्रातील कलाक्षेत्रासाठी नवा आदर्श ठरत असून, कला-संवर्धन, कलाकारांचा सन्मान व समाजप्रती असलेली बांधिलकी याचे प्रभावी दर्शन या कार्यक्रमातून घडले. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली सूर्यदत्त भविष्यातही कला, संस्कृती आणि समाजासाठी ही परंपरा अधिक दृढपणे पुढे नेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
















