महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची दक्षता, गुन्हेगारीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महापालिका निवडणुका शांततेत पार पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत साडेपाच हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे शहरात वर्षभरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, संजय पाटील, राजेश बनसोडे तसेच पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, राजलक्ष्मी शिवणकर, डॉ. राजकुमार शिंदे, मिलिंद मोहिते, कृषीकेश रावले, संभाजी कदम, रजनीकांत चिरुमुला, संदीप भाजीभाकरे उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे. मतदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणण्याच्या घटना तसेच अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. गुन्हेगारीचे उदात्तीकरण होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. गैरप्रकार आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी बंदोबस्त
निवडणुकीच्या काळात साडेसहा हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच राज्यभरातून १२०० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त असणार आहे. त्यांच्या मदतीसाठी एसआरपीएफच्या ८ कंपन्या तैनात असणार आहेत.
गुन्हेगारीमध्ये घट
खून (७९), खुनाचा प्रयत्न (१५३), दुखापत (१४५३), दरोडा व जबरी चोरी (२४२), घरफोड्या (५२८), बलात्कार (४७३), विनयभंग (८३६), वाहन चोरी (१५७२) व इतर चोऱ्या (११४३) या गुन्ह्यांमध्ये २०२४ च्या तुलनेत घट झाली आहे. मालमत्ता चोरीतील १२ कोटी ७१ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये ८ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत झाली होती. फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये २०२४ मधील १८१३ वरून २०२५ मध्ये १४५९ इतकी घट झाली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांतील ६ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. चैन स्नॅचिंगचे २०२४ मध्ये १०३ गुन्हे दाखल होते, तर २०२५ मध्ये १२७ गुन्हे दाखल आहेत. सर्व प्रकारच्या मंगळसूत्र चोरीचे गुन्हे नव्या कलमानुसार एकत्र करण्यात आल्याने ही वाढ दिसत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.















