एकमेव भारतीय म्हणून वैभव जैन यांना १० हजार डॉलर्सचे ग्रँड प्राइज
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) झपाट्याने विकसित होत असताना तिच्या मानवी आयुष्यावरील परिणामांबाबत सखोल, जबाबदार आणि मानवकेंद्री विचार मांडणारा भारतीय आवाज आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळकपणे समोर आला आहे.
चार्टर्ड अकाउंटंट वैभव जैन यांनी ‘फ्यूचर ऑफ लाइफ इन्स्टिट्यूट’ आयोजित ‘कीप द फ्युचर ह्युमन – क्रिएटिव्ह कंटेंट’ या आंतरराष्ट्रीय सर्जनशील लेखन स्पर्धेत १०,००० डॉलर्स (सुमारे ८.३ लाख रुपये) चे ग्रँड प्राइज पटकावले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत ते एकमेव भारतीय विजेते ठरले आहेत.
या जागतिक स्पर्धेसाठी जगभरातून ३०० हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यामधून वैभव जैन यांच्या लेखनाची निवड करण्यात आली असून, या स्पर्धेअंतर्गत एकूण १,००,००० डॉलर्सपेक्षा अधिक रकमेची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
तंत्रज्ञान, एआय सुरक्षा आणि डेटा गोपनीयता या विषयांचा वैभव जैन दीर्घकाळ अभ्यास करत आहेत. एआयच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीच्या तुलनेत तिच्या सुरक्षित व जबाबदार वापराबाबत पुरेशी आणि सखोल चर्चा होत नसल्याची चिंता त्यांनी आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडली आहे.
‘द बटन डझन्ट एक्झिस्ट’ या त्यांच्या विजयी निबंधात, एआयवर नियंत्रण मिळवण्यासाठी एखादे साधे ‘बटण’ असल्याचा गैरसमज त्यांनी ठामपणे फेटाळून लावला आहे. एआयवर प्रभावी नियंत्रणासाठी केवळ तांत्रिक उपाय पुरेसे नसून, मानवकेंद्री मूल्ये, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांनाही तितकेच महत्त्व असावे, असा ठाम संदेश त्यांनी दिला आहे.
या यशामुळे जागतिक पातळीवर भारतीय विचारविश्वाची दखल घेतली जाईल, तसेच एआयविषयक चर्चेला नवी आणि सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. वैभव जैन यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार मेधा कुलकर्णी, उद्योगपती प्रकाश धारीवाल तसेच लक्ष्मीकांत खाबिया, वर्धमान खाबिया, नीलेश खाबिया आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
















