भंगार विकलेल्या पैशावरून वाद, कोथरुड पोलिसांनी पत्नीविरुद्ध केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पत्नी नेहमीच किरकिर करते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात, हे सर्व पतींनी लक्षात घेण्यासारखा प्रसंग कोथरुडमध्ये घडला आहे.
भंगार विकून आलेल्या पैशांतील २०० रुपये पतीने कमी दिल्यावरून पती-पत्नीत भांडण झाले. ती नेहमीच किरकिर करते असे समजून त्याने तिच्याकडे लक्ष न देता झोपेत असल्याचे भासविले. आपण इतके बोलतोय आणि याला काहीच फरक पडत नाही असे वाटल्याने संतापलेल्या पत्नीने गॅसवरील उकळता चहा पतीच्या अंगावर टाकला.
त्यात पतीच्या कपाळावर मोठ्या प्रमाणात भाजले आहे. कोथरुड पोलिसांनी या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रवी दीपक गागडे (वय २७, रा. वसंतनगर, पौड रोड, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी प्रिया रवी गागडे (वय २२, रा. वसंतनगर, कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वसंतनगरमधील त्यांच्या घरी ३१ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी गागडे हे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात. त्यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.
रवी गागडे यांनी भंगार विकले होते. त्यातून आलेल्या पैकी ७०० रुपये पत्नीला दिले होते. २०० रुपये एकाला द्यायचे होते, ते त्यांनी दिले. या २०० रुपयांवरून प्रिया गागडे यांनी भांडण सुरू केले. सोमवारी रात्रीही याच कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली होती.
मंगळवारी सकाळी उठल्यावर प्रिया या रागात बोलत होत्या. रवी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून झोपल्याचे भासवून ते पडून राहिले होते. त्यामुळे प्रिया यांचा राग अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात गॅसवर ठेवलेला उकळता चहा रवी यांच्या अंगावर टाकला.
त्यात रवी यांच्या कपाळावर खूप भाजले. त्यांनी ससून रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. उपचार घेऊन आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मोहन दळवी तपास करीत आहेत.
















