प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने टिळक स्मारक मंदिरात रंगला कार्यक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, पुणे यांचा प्री-प्रायमरी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे रेट्रो थीमवर मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्लोक पठण, संगीत तसेच जुन्या काळातील गाण्यांवर आधारित रंगतदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय श्लोक पठणाने झाली, ज्यामुळे सभागृहात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली रेट्रो गीतांवरील नृत्ये आणि संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सुंदर वेशभूषा आणि तालबद्ध सादरीकरणाने उपस्थितांनी त्यांना भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमासाठी ब्रेन वर्ल्ड ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर रेशु अग्रवाल या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनःपूर्वक कौतुक केले तसेच अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले. त्यांनी शिक्षकवर्ग व शाळा व्यवस्थापनाच्या कार्याचीही प्रशंसा केली.
हा संपूर्ण कार्यक्रम समन्वयक भाविका राठोड व त्यांच्या समर्पित सहकारी कर्मचारीवर्गाच्या अथक परिश्रमामुळे यशस्वी ठरला.उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे हा वार्षिक सांस्कृतिक सोहळा उपस्थित सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.















