बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा तुफान जल्लोष : हजारोंची उपस्थिती
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या ‘सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ (SIPA) तर्फे आयोजित मेगा कॅम्पस इव्हेंटमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले कलाकार पुलकित सम्राट व वरुण शर्मा यांनी हजेरी लावली. त्यांच्या आगमनाने सूर्यदत्त कॅम्पस अक्षरशः उत्साहाने भारावून गेला होता. यावेळी आयोजित विशेष संवादात्मक सत्रात या कलाकारांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारत आपला अभिनय प्रवास उलगडला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक (EDO) सिद्धांत चोरडिया यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सूर्यदत्त बन्सी-रत्न सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपल्या खास विनोदी शैलीत आणि मनमोकळेपणाने उत्तरे दिली, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात हास्याची लकेर उमटली. कलाकारांच्या या मिश्किल अंदाजाने आणि सहज संवादामुळे विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा भरभरून आनंद लुटला.
हा संवादात्मक उपक्रम सूर्यदत्तच्या सर्वांगीण शिक्षण दृष्टिकोनाचे एक प्रभावी प्रतीक ठरला. विद्यार्थ्यांना केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास, दृष्टिकोन आणि व्यावसायिक तयारी अधिक भक्कम करण्यावर सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स भर देत असल्याचे या यशस्वी उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
सूर्यदत्त परिवाराच्या परंपरेनुसार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी उपस्थित मान्यवरांचा विशेष सन्मान केला. यावेळी त्यांनी कलाकारांना ‘ सूर्यदत्त सूर्यगौरव मानचिन्ह’, ‘सूर्यदत्त सुवर्णपदक’ आणि ‘सूर्यदत्त स्कार्फ’ प्रदान करून गौरविले.
पुलकित सम्राट यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, “तुम्ही जे करता त्यावर प्रेम करा. आवड आणि समर्पण असेल तर यश आपोआप तुमच्या मागे येते.” स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने मेहनत करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वरुण शर्मा यांनी आपल्या संदेशात समाज, पालक आणि शिक्षकांप्रती आदरभाव ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “आपण आज जे काही आहोत, त्यामागे पालकांचे संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे,” असे सांगत त्यांनी मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी आपल्या जीवनातील स्वानुभव कथन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता, सामाजिक जबाबदारीचे भान राखून ती आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मनोरंजनाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. चोरडिया म्हणाले की, ‘चित्रपट आणि मनोरंजनामुळे मानवी जीवनातील मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. दर्जेदार मनोरंजन मनाला उभारी देते, ज्यामुळे कार्यक्षमता, ऊर्जा आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया तसेच सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीआर प्रमुख स्वप्नाली कोगजे यांनी सांभाळली, तर असिस्टंट ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह अमोल फाटक आणि विधी विभागाच्या डॉ. मोनिका शेरावत यांनी समन्वयक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली.
सोशल मीडिया व्यवस्थापन चिन्मय सागर यांनी यशस्वीपणे हाताळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड यांनी आपल्या शैलीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहल नवलखा (सहाय्यक उपाध्यक्षा) यांच्या हस्ते आभार प्रदर्शन समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमातील व्यवस्था व पाहुणचाराची जबाबदारी प्राचार्य रसिका गुमास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी चोख बजावली. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करत असून, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना चित्रपटसृष्टी जवळून अनुभवण्याची आणि प्रेरणा घेण्याची सुवर्णसंधी मिळाली.
चित्रपट आणि मनोरंजन हे समाजाचे प्रतिबिंब असून, कला-संस्कृतीचा वारसा जपणे ही सूर्यदत्तची परंपरा आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रातील दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळते. पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा यांनी आमच्या विद्यार्थ्यांशी साधलेला हा दिलखुलास संवाद त्यांच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















