जुन्नरमध्ये जमिनीच्या वादातून केला होता खून : वारजे माळवाडी पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथील जमिनीच्या वादातून दारूच्या नशेत भावजयीवर चाकूने वार करून तिचा खून करून पुण्यात पळून आलेल्या दिराला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
तुषार निंबा साबळे (रा. निमगिरी, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अरुणा शरद साबळे (वय ३८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत शरद निंबा साबळे (वय ४२, रा. निमगिरी, ता. जुन्नर) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शरद साबळे यांच्या वाटणीला आलेल्या जमिनीवर त्यांचा भाऊ तुषार साबळे याने घर बांधल्यावरून दोघा भावांमध्ये चार महिन्यांपूर्वी वाद होऊन भांडणे झाली होती. तसेच जमिनीच्या कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत होते.
तुषार हा दारू पिऊन आला की त्यांच्याशी व त्यांची पत्नी शारदा साबळे हिच्याशी भांडणे करीत असे. ५ जानेवारी रोजी शरद साबळे हे शेळ्या चारण्यासाठी शेताकडे गेले होते. सायंकाळी मुले शाळेतून घरी आल्यानंतर तुषार हा शारदा साबळे यांना चाकूने मारहाण करीत असल्याचे त्यांनी पाहिले.
मुलांना आलेले पाहून तुषार साबळे पळून गेला. छाती व हातावर चाकूचे वार झाल्याने रक्तस्त्राव होऊन शारदा साबळे यांचा घरातच मृत्यू झाला. गुन्हा घडल्यापासून तुषार साबळे हा फरार होता. तो वारजे परिसरात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा यांना मिळाली.
त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांना कळविली. वारजे परिसरातील यशोदीप चौक येथे सापळा रचण्यात आला. तुषार साबळे तेथे येताच पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा यांनी झडप घालून त्याला पकडले. जुन्नर पोलिसांना कळविल्यानंतर त्यांचे एक पथक तातडीने पुण्यात आले व त्यांनी तुषार साबळे याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, निलेश बडाख यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा, नायकवडे व पोलीस अंमलदार चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


















