पुरस्कार वितरण सोहळ्याने पंचवीस वर्षांचा गौरवशाली प्रवास अधोरेखित
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : स्वानंद संस्थेच्या 2025-26 या रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहात पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याने झाली. “कोणाचाही द्वेष-मत्सर न करता विश्व हेच माझे घर या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन स्वानंद संस्था गेली पंचवीस वर्षे सातत्याने समाजकार्य आणि महिला सक्षमी करणाचे कार्य करीत आहे,” असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले. स्वानंद We Can या विचारसरणीची प्रचिती या कार्यक्रमातून आली, असेही त्यांनी नमूद केले.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा समाजासमोर मांडण्याचा मानस असल्याचे स्वानंदच्या अध्यक्षा शोभा बंब यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सर्व महिलांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम मेहर रिसॉर्ट्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
स्वानंद संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीत अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या स्वानंद सख्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. संस्थापिका अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांनी सुरुवातीला अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
त्यानंतर संस्थेचा कार्यभार अनुक्रमे कमल सुराणा, छाया मंडलेचा, चंदनबाला राका, राजश्री बिनायकिया, लीना कटारिया, कविता सेटीया, वर्षा टाटिया, कंचनमाला बाफना, सुनिता देसरडा, सुनिता बोरा आणि सध्याच्या अध्यक्षा शोभा बंब यांनी यशस्वीरीत्या सांभाळला.
या सर्व स्वानंद सख्यांनी संस्थेच्या उभारणीपासून आजपर्यंत मोलाचे योगदान दिले आहे. स्वतःचा विकास आणि सर्वांचा विकास हा उद्देश समोर ठेवून कार्यकर्त्यांबरोबर नेतृत्व घडविण्याचे कार्य स्वानंद संस्थेने केले आहे.
स्वानंदमधील प्रत्येक महिला ही एक स्वतंत्र संस्था असून, तिच्यातील गुणवत्ता, कार्यक्षमता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे काम संस्था करीत आहे. हरहुन्नरी महिलांना सन्मानित करून त्यांच्या आयुष्यातील आनंद द्विगुणीत करण्याचे कार्य स्वानंद संस्थेने सातत्याने केले आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना स्वानंदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साधना सवाने यांना स्वानंदरत्न साहित्य सेवा, रंजना शिंगवी व सुषमा मुथा यांना स्वानंदरत्न श्रुत आराधना, सरला कांकरिया यांना स्वानंदरत्न आदर्श माता, तर शोभा शिंगवी यांना स्वानंदरत्न कर्तव्यदक्ष नारी पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा शोभा बंब यांनी केले. सत्कारमूर्तींचा सन्मान प्रमुख अतिथी उद्योजिका नंदा कासार, समाजसेविका सुनीता कांकरिया आणि सुजाता नवले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थापिका अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया, स्वानंदच्या अध्यक्षा शोभा बंब, सुनिता देसरडा आणि कंचनमाला बाफना उपस्थित होत्या.
सत्काराला उत्तर देताना रंजना शिंगवी यांनी स्वानंद संस्थेने केलेल्या सन्मानामुळे अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. सरला कांकरिया यांनी आदर्श मातृत्वाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना, मुलं जेव्हा आदर्श होतात तेव्हा आई आदर्श ठरते असे सांगितले.
राष्ट्रउभारणीचे कार्य करणाऱ्या स्वानंद संस्थेने युवा पिढीचे कौतुक करून आईबरोबर मुलांनाही सन्मानित केल्याबद्दल उपस्थितांनी प्रशंसा केली. समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देणाऱ्या स्वानंद संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीस आणि पुढील उपक्रमांसाठी सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळंकुरे यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती सुषमा मुथा यांनी स्वानंद संस्थेने झाकलेल्या मोत्यांचा सन्मान करून अधिक उत्साह आणि प्रेरणा दिल्याचे नमूद केले, तर शोभा शिंगवी यांनी स्वानंदच्या पंचवीस वर्षांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना जैन आणि डॉ. श्वेता राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुजाता नवले यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सुजाता नवले, साधना सवाने, जयश्री कासार आणि कमल सातपुते यांनी केले.


















