कॅशबॅक व बोनसचे आमिष : कॉम्प्युटर इंजिनिअरची ३६ लाखांची फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला अल्प नफा देत वेबसाइटवर बनावट प्रॉफिट दाखवून प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांनी आता ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून फसवणुकीचा नवा प्रकार सुरू केला आहे. वाघोली येथील ३० वर्षीय कॉम्प्युटर इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी तब्बल ३६ लाख ७४ हजार ६५८ रुपये गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधिताने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एका दिवशी ई-मेलद्वारे गुंतवणुकीवर ५० टक्के फ्री कॅश बोनस मिळणार असल्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या ई-मेलमध्ये गुंतवणुकीवर १५ हजार रुपये फ्री कॅश बोनस मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. ‘परीमॅच’ या वेबसाइटवरून गेम खेळून फिडबॅक दिल्यास ५ हजार रुपये बोनस मिळेल, असा आणखी एक ई-मेल आल्याने त्यांनी त्यावर आवश्यक माहिती भरली.
वेबसाइटवर लॉगिन केल्यानंतर ‘फॉर्च्युन क्रिस्टल’ हा गेम सुरू झाला. दरम्यान, त्यांना सातत्याने प्रमोशनल कॉल येऊ लागले. गेम खेळताना मेन्यू बारमध्ये ‘डिपॉझिट’चा पर्याय असून त्यावर क्लिक करून पैसे भरण्यास सांगण्यात येत होते. यानुसार, जी-पेच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून दिलेल्या यूपीआयवर पैसे वर्ग करण्यात आले.
सुरुवातीला त्यांनी १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असता त्यांना १९ हजार रुपयांचा फायदा झाल्याचे वेबसाइटवर दाखवण्यात आले. त्यांनी एकूण २९ हजार रुपये काढून घेतल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी सात बँक खात्यांमधून १७६ व्यवहार करत एकूण ३६ लाख ७४ हजार ६५८ रुपयांची गुंतवणूक केली.
यानंतर जमा झालेल्या रकमेपैकी २ लाख रुपये विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता व्यवहार वारंवार ‘डिक्लाईन’ होत असल्याचे दिसून आले. वेबसाइटची अधिक माहिती घेतली असता अनेक लोकांची याच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले. तसेच, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वेबसाइटशी संबंधित संशयित बँक खाती गोठवून तब्बल ११० कोटी रुपये फ्रीज केल्याची माहिती मिळाली.
असे असतानाही, १२ डिसेंबर २०२५ रोजी विड्रॉलसाठी आवश्यक असल्याचे सांगत फिर्यादीकडून आणखी १८ हजार ५०० रुपये भरून घेण्यात आले. मात्र तरीही पैसे विड्रॉल झाले नाहीत. अखेर ‘परीमॅच’ या वेबसाइटवरून फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे करत आहेत.


















