परिमंडळ एक परिसरात १२ ठिकाणी रूट मार्च, ८९ जणांना हद्दीतून केले तडीपार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महापालिका निवडणूक शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडावी, यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी या काळात तब्बल २५६ गुन्हेगारांवर विविध प्रकारची कारवाई केली आहे.
निवडणूक प्रचारावर कोणताही प्रभाव पडू नये, यासाठी ८९ गुन्हेगारांना परिमंडळ एकच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले. १६४ जणांकडून कोणताही गुन्हा करणार नाही, अशा आशयाचे बाँड लिहून घेण्यात आले. २१ जणांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली. तसेच एका गुन्हेगाराला एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. नागरिकांना मतदान करताना कोणीही दडपण आणू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी परिमंडळ एकच्या हद्दीत १२ ठिकाणी पोलिसांनी रूट मार्च काढला होता.


















