प्रभाग क्रमांक ९ मधील बाबुराव चांदेरे यांना दिला होता पाठिंबा : बाणेरमधील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना बाणेर परिसरात मतदान सुरू असताना घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, रा. धनशिला बंगला, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी प्रणित प्रमोद निम्हण, प्रणय प्रमोद निम्हण, प्रसन्न रामभाऊ निम्हण, संदीप नामदेव निम्हण, परवेज शेख (सर्व रा. बाणेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेरमधील सत्व हॉटेलच्या गेटजवळ १५ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी धनकुडे यांच्या नणंद सरला बाबुराव चांदेरे यांचे पती बाबुराव चांदेरे हे बाणेरमधून निवडणूक लढवत आहेत. धनकुडे कुटुंबीयांनी चांदेरे यांना पाठिंबा दिला होता.
चांदेरे यांना पाठिंबा दिल्याने निम्हण कुटुंबीय चिडले होते. गुरुवारी १५ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणी धनकुडे बंगल्याच्या परिसरात थांबल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरू असताना आरोपी निम्हण यांनी धनकुडे यांच्या बंगल्यात प्रवेश केला.
धनकुडे यांच्या मोटारीवरील चालक सचिन उत्तम फासगे याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत फासगे जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी कल्याणी यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.
कल्याणी यांना वाचविण्यासाठी आलेल्या नवनाथ देशमुख यांनाही काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कल्याणी यांच्या नातेवाईक सायली निलेश शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिला धक्काबुक्की केली.
तसेच आरोपी प्रणित निम्हण याने, ‘निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला बघून घेतो,’ अशी धमकी दिली, असे कल्याणी धनकुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कल्याणी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गर्दी करून मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.















