भवानी पेठेतील घटना : काशेवाडी–डायस प्लॉट प्रभागात झाला होता पराभव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महापालिका निवडणुकीत यांच्यामुळे कमी मते पडली व पराभव झाला, असे समजून भाजप उमेदवाराच्या नातेवाईकांनी चुलत भावाच्या घरात शिरून कुटुंबाला शिवीगाळ करत हात-पाय तोडण्याची धमकी दिली.
याबाबत गणेश शिवाजी लडकत (वय ५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मंदार लडकत, प्रीतम बनकर, रोहित शिंदे, प्रज्ञा लडकत (रा. भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार १६ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ संदीप लडकत हे प्रभाग क्रमांक २२-ब, काशेवाडी–डायस प्लॉट येथून भाजपचे उमेदवार म्हणून उभे होते.
काँग्रेसचे रफीक शेख यांनी संदीप लडकत यांचा पराभव केला. रफीक शेख यांना १४ हजार ४९ मते मिळाली, तर भाजपचे संदीप लडकत यांना १३ हजार ६९९ मते मिळाली. संदीप लडकत यांचा ३५० मतांनी पराभव झाला.
इतक्या कमी मतांनी झालेल्या पराभवामुळे संदीप लडकत यांच्या नातेवाईकांच्या जिव्हारी हा प्रकार लागला. आपल्या चुलत भावाच्या कुटुंबामुळे कमी मते पडली व त्यामुळे पराभव झाला, असे त्यांना वाटले.
त्याच कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत हात-पाय तोडण्याची धमकी दिली. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम करीत आहेत.















