नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचे आवाहन : भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांची निवड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भूमवासीयांनी आम्हाला सभागृहात पाठवले आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांनी केले.
भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सभागृहात प्रवेश करताना राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक सूरज गाढवे यांची निवड करण्यात आली, तर स्वीकृत सदस्यपदी संजयनाना गाढवे यांची नियुक्ती झाली. या निवडीबद्दल नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच आलमप्रभू शहर विकास आघाडीचे नूतन नगरसेवक अभिजित शेटे, मंगल नाईकवाडी, भाग्यश्री माने, तौफीक कुरेशी व रीमा शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी सांगितले की, भूम शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
मागील काळात भूमच्या जनतेने आमच्यावर विश्वास टाकला असून, त्या विश्वासाच्या बळावर शहराचा कायापालट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. पुढील काळातही विकासकामे अखंडपणे सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण जाधव यांच्यासह धनंजय मस्कर, प्रदीप चौधरी, कैलास पवार, समाधान पोतदार, आसिफ जमादार, बालाजी माळी, सुनील माळी, खंडेराव गोयकर, नितीन साठे, बाळासाहेब अंधारे, सागर टकले, नूतन सुर्वे, मयूर शेटे, मुशीर शेख, श्रीराम बोराडे, आकुबाई पवार, संजय शिंदे, अमोल शिंदे, अख्तर जामदार, रईस काझी, प्रथम वराडे, पोपट धावरे, तानाजी शिंदे, धनाजी गाढवे, मंगल आकरे, शीतल शिंदे आदी उपस्थित होते.

















