महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : नेत्रसेवेच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतानाही अंधांची संख्या आजही नियंत्रित झालेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. दृष्टीशी संबंधित अनेक समस्या उपचाराने पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. मात्र, योग्य माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे अनेकांना आयुष्यभर दृष्टी गमवावी लागते. त्यामुळे दृष्टीहिनतेच्या समस्येला सामोरे जाणे हे समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सिंबायोसीस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले.
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या “पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कारांचे” वितरण डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. यंदाचा संस्थात्मक पातळीवरील पुरस्कार पुण्यातील पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशन संचलित एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांना, तर वैयक्तिक पातळीवरील पुरस्कार मुंबई येथील प्रा. डॉ. अमूल्य साहू यांना प्रदान करण्यात आला.
या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे आहे. एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे कार्याध्यक्ष नितीन देसाई यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, चेअरमन डॉ. सतीश देसाई, सचिव डॉ. राजेश पवार, डॉ. संपत पंगुलिया, कर्नल डॉ. मदन देशपांडे, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा तसेच परवेझ बिलिमोरीया उपस्थित होते. मॉडर्न कॅफेचे स्व. जी. एम. शेट्टी यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. मुजुमदार पुढे म्हणाले की, डोळे ही जगाकडे पाहण्याची खिडकी असून मानवी भावभावनांचे प्रभावी प्रतिबिंब त्यातून उमटते. राग, प्रेम, वात्सल्य अशा भावना डोळ्यांतून व्यक्त होतात. व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठीही डोळ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
आज जगात सुमारे चार कोटींपेक्षा अधिक अंध व्यक्ती असून भारतातही सुमारे ९० हजार अंध व्यक्ती असल्याची आकडेवारी वेदनादायी आहे. अंधत्वामुळे परावलंबित्व येत असले, तरी अंध व्यक्ती दुर्बल असतात असे नाही. अंध असूनही अनेकांनी यशाची शिखरे गाठल्याची उदाहरणे समाजात आहेत.
हेलन केलर यांचे कार्यकर्तृत्व हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. काहींना डोळे असूनही दृष्टीकोन नसतो, तर काहींना अंध असूनही दृष्टीकोन असल्याने ते समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, असेही त्यांनी सांगितले. तिरळेपणासारख्या समस्या छोट्या शस्त्रक्रियेद्वारे दूर करता येतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी बोलताना डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले की, नेत्रदानाबाबत आजही समाजात अपेक्षित जागरूकता नाही. देवाने दिलेली डोळे ही अनमोल देणगी योग्य जनजागृतीअभावी वाया जात आहे. पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलसारख्या संस्थांनी नेत्रदान चळवळीला अधिक गती देणे गरजेचे आहे.
कार्यक्रमात पुरस्कारार्थी नितीन देसाई आणि प्रा. डॉ. अमूल्य साहू यांनी मनोगत व्यक्त केले. परवेझ बिलिमोरीया यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन डॉ. सतीश देसाई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आनंद खडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील भुजबळ यांनी केले.

















