कॅम्प, कोंढवा, बोपदेव घाट, कापूरहोळ, कोंढणपूर, सिंहगड घाट, खडकवासला परिसर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या प्रतिष्ठेच्या सायकल स्पर्धेनिमित्त बुधवारी, २१ जानेवारी रोजी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेमुळे शहरातील कॅम्प, महात्मा गांधी रोड, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरातील प्रमुख रस्ते दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत स्पर्धेच्या वेळेनुसार तात्पुरते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
ही सायकल स्पर्धा कॅम्पमधून दुपारी साडेबारा वाजता सुरू होईल. कोंढव्यामार्गे बोपदेव घाटातून ही स्पर्धा चिंबळी, नारायणपूर, केतकावळे, कापूरहोळ, मोहरी, अंबवणे, वांगणी, शिवपूर, कोंढणपूर येथून सिंहगड घाट रोडने डोणजे येथे येईल. तेथून खडकवासला धरण, किरकटवाडी, नांदेड सिटी येथे ही स्पर्धा संपणार आहे.
कॅम्पमधील ब्ल्यू नाईल हॉटेल चौक ते इस्कॉन मंदिर व नांदेड गाव फाटा ते नांदेड सिटी मेन गेट दरम्यानचा मार्ग वगळता कोणताही मार्ग ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ बंद राहणार नाही, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिमंत जाधव यांनी सांगितले.
कॅम्प व महात्मा गांधी रोड परिसर :
ब्ल्यू नाईल हॉटेल चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, पुढे खाण्या मारुती चौक (एम. जी. रोड) ते सोलापूर बाजार पोलीस चौकी (नेपियर रोड) आणि गोळीबार मैदान चौक.
कोंढवा आणि बोपदेव घाट माथा :
गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक, ज्योती हॉटेल चौक ते शीतल पेट्रोल पंप आणि पुढे खडी मशीन चौक. तसेच खडी मशीन चौक ते ट्रिनिटी कॉलेजमार्गे बोपदेव घाट.
सिंहगड रोड परिसर :
खडकवासला ते किरकटवाडी आणि किरकटवाडी ते नांदेड सिटी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल.
















