समर्थ पोलिसांनी १२६ सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगाराकडून ९० हजार रुपयांचे दागिने जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बेडरूमचा लोखंडी दरवाजा उघडून टेबलावर ठेवलेले ९० हजार रुपयांचे मिनी गंठण चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी परिसरातील तब्बल १२६ सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याला अटक केली आहे.
सोहेल समीर शेख (वय २६, रा. न्यू नाना पेठ, पत्रा चाळ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सोहेल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. याबाबत वनिता श्रीनिवास अंदे (वय ४६, रा. भवानी पेठ, कामगार मैदान) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा घरफोडीचा प्रकार ८ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच ते सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेडरूममध्ये झोपलेल्या असताना चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूमचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने उघडला. त्यानंतर टेबलावर ठेवलेले ९० हजार रुपयांचे मिनी गंठण चोरून नेले.
घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर समर्थ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये शीतलादेवी मंदिराबाहेर सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसून आला. त्यानंतर तो ज्या मार्गाने पुढे गेला, त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे त्याचा मागोवा घेतला.
त्यावरून हा गुन्हा सोहेल शेख याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेतला असता तो पुण्याबाहेर पळून गेल्याचे समजले. दरम्यान, तो पुन्हा पुण्यात आल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला २० जानेवारी रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरलेले ९० हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, सहायक पोलीस निरीक्षक धीरज राऊत, पोलीस अंमलदार संतोष पागार, रवींद्र औचरे, रोहीदास चाघेरे, शिवा कांबळे व अमोल गावडे यांनी केली आहे.
















