कोची–पुणे फ्लाइटमधील वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगात तत्पर मदत : इंडिगो एअरलाइन्सकडून गौरव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोचीहून पुण्याकडे येणाऱ्या इंडिगो विमानात अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगात डॉ. पूजा नाहर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले. त्यांच्या या मानवतावादी सेवाभावाची दखल घेत इंडिगो एअरलाइन्सकडून त्यांना अधिकृत आभार पत्र देण्यात आले आहे.
इंडिगो एअरलाइन्सच्या कोची–पुणे मार्गावरील 6E-242 या विमानात 19 जानेवारी 2026 रोजी प्रवासादरम्यान अचानक एका प्रवाशाची प्रकृती गंभीर झाली. विमानातील तणावपूर्ण परिस्थितीत डॉ. पूजा नाहर यांनी कोणताही विलंब न करता पुढे येत वैद्यकीय उपचार सुरू केले.
आपल्या वैद्यकीय कौशल्यासोबतच प्रसंगावधानता आणि संवेदनशीलतेचे उत्कृष्ट दर्शन घडवत त्यांनी संबंधित प्रवाशाची प्रकृती नियंत्रणात आणली. त्यांच्या शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि वेळेवर दिलेल्या उपचारांमुळे प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला, तसेच विमानातील इतर प्रवाशांनाही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
या उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेत इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने कस्टमर एक्सपीरियन्स एक्स्पर्ट आकाश मिश्रा यांनी डॉ. पूजा नाहर यांना अधिकृत आभार पत्र पाठवले. या पत्रात त्यांच्या निस्वार्थ सेवेचे, धैर्याचे आणि कर्तव्यनिष्ठेचे विशेष कौतुक करण्यात आले असून, अशा वैद्यकीय व्यावसायिकांमुळेच आपत्कालीन परिस्थितीत माणुसकी जिवंत राहते, असे नमूद करण्यात आले आहे.
डॉ. पूजा नाहर यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक जबाबदारी, सेवाभाव आणि समर्पण यांचे उत्तम उदाहरण समाजासमोर आले असून, त्या खऱ्या अर्थाने मानवतेच्या देवदूत ठरल्या आहेत.
“डॉक्टर म्हणून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला मदत करणे हे माझे कर्तव्यच आहे. त्या क्षणी मी केवळ डॉक्टर म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणूनही पुढे आले. इंडिगो एअरलाइन्स आणि संपूर्ण टीमने दाखवलेले सहकार्य उल्लेखनीय होते. अशा प्रसंगांतून मानवता आणि सेवाभाव अधिक बळकट होतो.” – डॉ. पूजा नाहर
















