अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५३ किलो गांजासह ४० लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गांजा वाहतुकीसाठी फॉर्च्युनर गाडीचा वापर केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ५३ किलो गांजासह एकूण ४० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रीतम रवींद्र कुंजीर (वय ३२, रा. धुमाळ मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून गांजाचा मोठा साठा विक्रीसाठी थेऊर येथे आणला जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १० मार्च रोजी रात्री ११ वाजल्यापासून सापळा रचला.
पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास संशयास्पद फॉर्च्युनर गाडी तेथे आली. पोलिसांनी गाडी थांबवून चालक प्रीतम कुंजीर याला ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये १० लाख ६० हजार २८० रुपये किमतीचा ५३ किलो १४ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ३० लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर गाडी आणि एक मोबाईल फोन असा एकूण ४० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, विशाल भिलारे, राहुल शिंदे, अक्षय शिर्के, आशा भिंगारे तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक पैठणे, पोलीस अंमलदार आण्णा माने, सुरज कुंभार आणि अशोक गिरी यांनी सहभाग घेतला.















