राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत दोन दिवसीय शासकीय सहलीसाठी संधी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील आरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी संस्कृती नितीन गुंजाळ हिची राज्य शासनाच्या समग्र शिक्षा २०२५–२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आविष्कार अभियान या उपक्रमाअंतर्गत राज्यांतर्गत अभ्यासभेटीसाठी भूम तालुक्यातून निवड करण्यात आली आहे. ही शासकीय सहल दिनांक ११ मार्च रोजी रवाना झाली.
आरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. यावेळी संस्कृती नितीन गुंजाळ हिची राज्यांतर्गत अभ्यासभेट सहलीसाठी निवड झाल्याने तिच्यासह इतर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर शासकीय अभ्यासभेट दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आली असून या सहलीमध्ये लातूर शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.
या अभ्यासभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना राजीव गांधी प्राणी संग्रहालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटोरोलॉजी सेंटर, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क, स्वामीनारायण मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवार वाडा आणि लाल महाल यांसारख्या ऐतिहासिक, वैज्ञानिक व धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
या सहलीसाठी तालुक्यातील इयत्ता सहावी ते आठवी गटातून आरसोली, पाटसांगवी, चुंबळी आणि निपाणी येथील एकूण सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे राज्य शासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
















