आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : समर्थ क्रॉप केअर या कंपनीच्या माध्यमातून महिलांना १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या प्रशांत अनिल गवळी याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली आहे.
शेतमाल निर्यातीच्या नावाखाली समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक प्रशांत गवळी व इतरांनी गुंतवणूकदारांना १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून पुणे, अहिल्यानगर, सोलापूरसह राज्यातील १२ हून अधिक जिल्ह्यांमधील ४० ते ४४ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी समर्थ क्रॉप केअरमध्ये गुंतवणूक केली आहे.
गवळी व त्याच्या साथीदारांनी प्रामुख्याने महिलांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर महिन्याला ५ टक्के नफा व ५ टक्के मुद्दल, अशा प्रकारे एकूण १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. ही रक्कम सुमारे ४ ते ५ हजार कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
सुरुवातीला काही काळ गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला. मात्र सप्टेंबरपासून ना मुद्दल ना नफा, असा प्रकार सुरू झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली. याबाबत गुंतवणूकदारांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.
प्रशांत गवळी याने अनेक वेळा वेगवेगळी कारणे सांगून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील, असे आश्वासन दिले होते. मागील तीन वेळचे वायदे फोल ठरल्यानंतर त्याने फेब्रुवारीपासून परतावा देण्याचा नवा वायदा केला होता.
मात्र त्याच्यावरून गुंतवणूकदारांचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले.
हडपसर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी प्रशांत गवळी याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख व उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुंतवणूकदारांना संपर्क साधण्याचे आवाहन – समर्थ क्रॉप केअरमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नागरिकांनी गुंतवणूक केली असून, हजारो गुंतवणूकदार विविध भागांत विखुरलेले आहेत. या प्रकरणात फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
















