देशभरातील गुजराती समाज संघटनासाठी महत्त्वाची जबाबदारी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : देशभर तसेच गुजरात राज्याबाहेर वास्तव्यास असलेल्या गुजराती समाजाला एकत्र आणण्यासाठी गुजरात सरकारने विशेष समितीची स्थापना केली असून, या समितीवर सामाजिक कार्यात सक्रिय असलेले डॉ. राजेश शहा यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
देशभर तसेच गुजरात राज्याबाहेर वास्तव्यास असलेल्या गुजराती समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने विशेष समितीची स्थापना केली आहे. या समितीवर सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे डॉ. राजेश शहा यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे अधिकृत आदेश गुजरात सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी विनेश सिंह यांनी जारी केले आहेत. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी असून, या कालावधीत देशभरातील गुजराती समाजाचे संघटन, विविध संस्थांशी समन्वय आणि समाजहिताचे उपक्रम राबविण्याची जबाबदारी समितीवर राहणार आहे.
गुजराती समाजाच्या संघटनातून त्यांच्या क्षमतेचा देशाच्या विकासासाठी प्रभावी उपयोग व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या समितीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून गुजरातबाहेरील गुजराती समाजाशी थेट संपर्क साधून त्यांना सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक कार्यासाठी एकत्र आणण्यावर भर दिला जाणार आहे.
गुजराती समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक क्षमतेचा उपयोग राष्ट्रीय प्रगतीसाठी व्हावा, हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. विविध राज्यांत कार्यरत असलेल्या गुजराती संस्था, उद्योजक, युवक व व्यावसायिक यांना एकत्र आणून देशाच्या उत्कर्षात योगदान देणे, हे समितीचे प्रमुख ध्येय आहे. डॉ. शहा यांच्या अनुभवामुळे समितीच्या कार्याला अधिक प्रभावी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. राजेश शहा यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नुकतेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे. तसेच प्रतिष्ठित ‘फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’साठी दिला जाणारा जमनालाल बजाज पुरस्कार त्यांना तीन वेळा प्रदान करण्यात आला आहे.
याशिवाय समाजरत्न, आदर्श व्यापारी, जीवनगौरव पुरस्कार, व्यापार भूषण, राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार, कर्मवीर पुरस्कार, बेस्ट बिझनेसमन पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
पुण्यातील सुप्रसिद्ध ‘लाडू-चिवडा’ उपक्रमाचे ते जनक असून, या उपक्रमासह त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.
डॉ. शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ या नामांकित शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. तसेच एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष व श्री पूना गुजराती बंधु समाज (११० वर्षांहून अधिक काळ कार्यरत संस्था) चे मॅनेजिंग ट्रस्टी म्हणूनही ते कार्यरत आहेत.
याशिवाय पुना मर्चंट चेंबरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव, तसेच महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या शिखर संघटना ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (FAM)’ चे गेल्या २५ वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार म्हणूनही त्यांची जबाबदारी आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत राहून डॉ. राजेश शहा सातत्याने समाजसेवेत योगदान देत आहेत.















