बनावट सोन्याची बिस्किटे खरे असल्याचे भासवून महिलेची फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वयस्कर महिलेला जेवण वाटप करीत असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवायला सांगून हातचलाखी करून ती लांबविणाऱ्या चोरट्यांना खंडणीविरोधी पथकाने पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात दोन हुबेहुब बनावट सोन्याची बिस्किटे आढळून आली. त्यातून कराड सिटीमधील एक गुन्हा उघडकीस आला आहे.
दिलीप विश्वनाथ स्वामी ऊर्फ जाधव (वय ५२, रा. जळकोट, जि. लातूर) आणि अमोल बाबु गिरी (वय ५३, रा. अहमदपूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दिलीप स्वामी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लातूरमध्ये अॅट्रोसिटीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले हे हडपसर येथील भाजी मंडई परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. रेकॉर्डवरील आरोपी दिलीप स्वामी हा त्याच्या साथीदारासह साधना विद्यालयाकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडवर चोरी करण्याच्या तयारीत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन दिलीप स्वामी व अमोल गिरी यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी २४ जुलै २०२५ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता शनिवारवाड्याजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिर फुटपाथजवळ एका वयस्कर महिलेस जेवण वाटप सुरू असल्याचे सांगितले.
तेथे गर्दी असल्याने तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवा, असे सांगून हातचलाखीने पिशवी चोरून नेली होती. हा गुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात दोन हुबेहुब बनावट सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातूची बिस्किटे व एक बेनटेक्सची चैन मिळून आली.
या दोघांनी इर्टिगा गाडीतून प्रवास करून कराड येथे एका वयोवृद्ध महिलेला बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून तिच्या गळ्यातील मणी-मंगळसूत्र काढून घेतले होते. कराड सिटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर अपहरण, अॅट्रोसिटी व फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, चेतन आपटे, विनोद महाजन, गणेश खरात व आझाद पाटील यांनी केली आहे.















