अगोदरच टेलिग्राम ग्रुप वर संपूर्ण पेपर अपलोड : सायन्स पेपर खरेदी करण्याचे आवाहन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर टेलिग्राम चॅनेलचा वापर केला जातो. आता दहावीच्या बोर्ड परीक्षेचे पेपर फुटवण्यासाठीही टेलिग्राम ग्रुपचा वापर केल्याचे समोर आले आहे. दहावीच्या गणित भाग-१ आणि गणित भाग-२ या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाले आहे. गणित भाग-१ चा पेपर आदल्या दिवशी, तर ९ मार्च रोजी होणारा गणित भाग-२ चा पेपर ६ मार्चलाच टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करण्यात आल्याचे आढळले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून हे पेपर खरेदी करण्याचे आवाहनही करण्यात येत होते. त्यामुळे बोर्डाचे नेमके किती पेपर फुटले असावेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत जेवळीकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी टेलिग्राम चॅनेलवरील ग्रुपधारक अॅडमिन, ग्रुपमधील सदस्य आणि या गैरप्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेतील पेपरफुटीबाबत माहिती दिली.
त्यासंदर्भातील तक्रार व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्यात आली होती. त्यामध्ये संबंधित टेलिग्राम ग्रुपची लिंकही देण्यात आली होती. मीनाक्षी राऊत यांनी मोबाईलवर टेलिग्राम अॅप उघडून तपासणी केली असता “Maharashtra State Board 2026 Papers” नावाचा ग्रुप आढळून आला.
त्या ग्रुपमध्ये गणित-१ आणि गणित-२ या विषयांचे संपूर्ण प्रश्नपत्रिका बोर्डाच्या वेळापत्रकानुसार अपलोड केल्याचे दिसून आले. गणित-१ चा पेपर (६ मार्च रोजी होणारा) ५ मार्च रोजी सायंकाळी ८.३७ वाजता ग्रुपवर टाकण्यात आला होता. तर गणित-२ चा पेपर (९ मार्च रोजी होणारा) ६ मार्च रोजी दुपारी ४.५६ वाजता अपलोड करण्यात आला होता.
ग्रुपवरील प्रश्नपत्रिका आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत प्रश्नपत्रिकांची पडताळणी केली असता त्या एकसारख्याच असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय, ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.४७ वाजता ग्रुपवर इंग्रजीमध्ये संदेश टाकून सायन्स-१ आणि सायन्स-२ चे पेपर उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. तसेच हे पेपर खरेदी करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
त्यामुळे गणिताच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांबरोबरच आणखी किती पेपर फुटले असावेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करीत आहेत.















