स्वदेशी उत्पादनांच्या प्रचारासाठी व्यापाऱ्यांचा संकल्प :‘CBN’ व्यासपीठाची घोषणा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पूना मर्चेंटस् चेंबरच्या वतीने चेंबरच्या प्रांगणात ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वदेशी उत्पादित वस्तू जनजागृती अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
स्वदेशी उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक उत्पादकांना बळकटी देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित सभासदांनी स्वदेशी उत्पादनांचा व्यापार आणि प्रचार अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
देशी उद्योगांना चालना देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, मार्केटयार्ड परिसरातील युवा व्यापाऱ्यांसाठी ‘चेंबर बिझनेस नेटवर्क’ (CBN) या नव्या व्यासपीठाचीही घोषणा करण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने युवा व्यापाऱ्यांना एकत्र आणून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसाय वृद्धीसाठी नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. या कार्यक्रमास चेंबरचे पदाधिकारी, सभासद तसेच मोठ्या संख्येने युवा व्यापारी उपस्थित होते.















