सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये विशेष मार्गदर्शन सत्र : युवापिढीला भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व पटवले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तंत्रज्ञान आणि यंत्रांच्या सहाय्याने भौतिक प्रगती कितीही झाली, तरी मानवी संवेदना आणि मूल्यांचा विकास झाल्याशिवाय तो खरा विकास ठरत नाही, असे प्रतिपादन भगवान महावीरांच्या आध्यात्मिक परंपरेतील ७९ वे उत्तराधिकारी गच्छाधिपती परमपूज्य जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि ‘ज्योत’ स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स येथे आयोजित विशेष संवाद सत्रात ते बोलत होते. यावेळी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजांनी भारतीय परंपरेच्या जागतिक महत्त्वावर विशेष भर दिला. आजच्या तणावपूर्ण आणि स्पर्धेच्या युगात भारतीय मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीच संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवू शकते, असे ते म्हणाले. प्रगतीच्या शिखरावर पोहोचताना मानवाने अहंकाराचा त्याग करून परोपकारी वृत्ती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“यंत्रांची प्रगती शरीराला भौतिक सुख देऊ शकते; परंतु मनःशांती आणि विश्वकल्याणाचे ध्येय गाठण्यासाठी मानवी मूल्यांकडे परत वळावे लागेल. समाजाप्रती संवेदनशीलता हीच व्यक्तीला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत बनवते,” असा संदेश त्यांनी युवापिढीला दिला. ‘भारतीय ज्ञानपरंपरा – जागतिक अस्थिरतेवर उपाय’ आणि ‘सबरीमाला पुनर्विचार – भारतातील धर्माचे भविष्य’ या दोन विषयांवर त्यांनी सखोल विवेचन केले.
जगभर वाढत असलेल्या अशांतता, अन्याय, प्रदूषण आणि बेरोजगारी यांसारख्या समस्यांकडे लक्ष वेधत त्यांनी भारतीय ज्ञानपरंपरेच्या पुनर्जागरणाची गरज व्यक्त केली. जागतिक पातळीवरील निर्णयप्रक्रियेतही बदल आवश्यक असून, विश्वकल्याणाचा विचार केंद्रस्थानी ठेवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. सुषमा चोरडिया यांनी आभार मानताना, “महाराजांच्या दिव्य विचारांमुळे संपूर्ण कॅम्पस पवित्र आणि चैतन्यमय झाला,” असे सांगितले.
या कार्यक्रमात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक, कायदेतज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ६०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
सध्या जगभर तणावपूर्ण वातावरण आहे. अशा परिस्थितीत जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जगाला विश्वशांतीचा आणि अहिंसेचा मार्ग भारतीय विचारधारेतूनच मिळू शकतो. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यवत्त एज्युकेशन फाउंडेशन















