महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
परांडा : परांडा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत सिंगल फेज व थ्री फेज वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल मोटे यांनी महावितरण प्रशासनाकडे तात्काळ लोडशेडिंग बंद करण्याची मागणी केली आहे.
याबाबत महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वरिष्ठांकडून तोंडी सूचना असल्याचे सांगण्यात आले. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून, उन्हाळ्यामुळे उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस सुरू असून, मतदारसंघात बिबट्याचा वावरही आढळून आला आहे. बिबट्याकडून पशुधनावर हल्ल्याच्या घटनाही घडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून ग्रामीण भागातील वीज कपात तात्काळ बंद करून वीजपुरवठा सुरळीत व पूर्ववत करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राहुल मोटे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन महावितरणचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता लातूर तसेच अधीक्षक अभियंता धाराशिव यांना देण्यात आले आहे.
बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि मतदारसंघात शाश्वत सिंचन व वीज विकासकामे राबविणारे म्हणून ओळख असलेले आमदार राहुल मोटे यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



















