हडपसर पोलिसांत गुन्हा : भेकराईनगरमधील दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हातात पिस्तूल घेऊन दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, एकाला वर पोहोचवले आहे, आता तुझा नंबर लावू का, असे म्हणत दोघा सराईतांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. परिसरात दशहत पसरविल्याने दुकानदारांनी दुकाने बंद केली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेकराईनगरमधील शिवशंकर हाईट्स परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी भेकराईनगरमधील दुकानदाराने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचे भेकराईनगरमधील शिवशंकर हाईट्समध्ये दुकान आहे. बुधवारी (दि. २४ नोव्हेंबर) दुपारी सव्वातीनच्या सुमारास दोघे सराईत त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने फिर्यादीला दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, मी सांगितल्याशिवाय दुकान उघडायचे नाही, आधीच एकाला वर पोहोचवला आहे. आता तुझा नंबर लावून घेऊ नको, असे म्हणून त्यांना दुकान बंद करायला लावले. त्याशिवाय दहशत परसवून इतर दुकानदारांनाही दुकाने बंद करण्यास भाग पाडले. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने पुढील तपास करीत आहेत.















