कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल : कोंढव्यातील महावितरण कार्यालयात घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वीजपुरवठा खंडीत झाल्याने महावितरणच्या कोंढवा कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही घटना कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील महावितरणच्या कार्यालयात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
दत्तात्रय धांडेकर (वय ३५), प्रथमेश धांडेकर (वय ३२, रा. दोघे रा. धांडेकर वस्ती, येवलेवाडी, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महावितरणचे सहाय्यक अभियंता सुनील पाटील (वय ५६, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, महावितरणाचे कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळ कार्यालय आहे. बुधवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी दहाच्या सुमारास धांडेकर महावितरणच्या कार्यालयात गेले. रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला असल्याचे धांडेकर यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यालयात गोंधळ घालून कर्मचारी कृष्णा गुट्टे यांना धक्काबुक्की केली तसेच सहाय्यक अभियंता पाटील यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकऱणी धांडेकर यांना अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे तपास करत आहेत.
















