पुण्यात एकच खळबळ : जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून ऑफीसरनं काढला पळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे
पुणे : सरकारी कार्यालयातील काम करुन देण्यासाठी अधिकारी लाचेची मागणी करत असतात. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्याने लाच घेण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने अधिकाऱ्याच्या कार्यालयात पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या अधिकाऱ्याने कार्यालयातून पळ काढला. झालेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. कोरंटीवार यांच्या केबीनमध्ये पैशांचा पाऊस पडल्याचे चित्र पहायला मिळाले. कोरंटीवार यांच्याकडे दलित वस्ती संदर्भातील काम मंजूर करुन घेण्यासाठी शिरुर येथील एक व्यक्ती आली होती. त्यांनी लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र लाचेची रक्कम स्विकारण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने अधिकाऱ्याच्या केबीनमध्ये पैसे उधळले. या प्रकारानंतर अधिकाऱ्याने तिथून पळ काढला. या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, कोरंटीवार म्हणाले की, दलित वस्तीचे काम मंजूर करुन घेण्यासाठी एक व्यक्ती माझ्या कार्यालयात आली होती. त्यांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला. तुमचे काम करुन देतो, तुम्ही जा असे त्यांना सांगितले. परंतु त्या व्यक्तीने माझ्या कार्यालयातच नोटा फेकल्या. घडलेल्या प्रकरानंतर पैसे फेकणाऱ्या व्यक्तीवर काय कारवाई होते, हे पहावे लागेल.














