पुणे पोलिसांची दमदार कारवाई : पोलीस पथक रायपूरहून पुण्याकडे रवाना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती. पुणे पोलिसांनी कालीचरण महाराजाला रायपूरमधून अटक केली असून, न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन हे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.
पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कालीचरण महाराजाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
महात्मा गांधी यांच्या विरोधात धर्मसंसदेमध्ये आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले होते. कालीचरण महाराजावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक देखील करण्यात आली. रायपूर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केल्यानंतर पोलीस कोठडी घेण्यात आली होती. कालीचरण महाराज विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये कालीचरण महाराज पुणे पोलिसांना हवा होता. समाज माध्यमावर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे.
रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराजाला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी तिकडे धाव घेतली. न्यायालयाकडे कालीचरण महाराजाचा ताबा मिळण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने पुणे पोलिसांची विनंती मान्य करून कालीचरण महाराजाचा ताबा पुणे पोलिसांकडे दिला आहे. न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलीस पुण्याकडे रवाना झाल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. त्याला पुणे न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.














