पुणे सायबर पोलिसांची कारवाई : शिक्षक भरती घोटाळ्यातील सहभाग आला समोर
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेतील एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सुशील खोडवेकर यांना अटक केल्याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके यांनी दिली आहे. सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे उपसचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत आहेत. पुणे सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आजपर्य़ंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व प्रितीश देशमुख यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी 2019-20 परीक्षेच्या निकालात तब्बल 7880 अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढवून त्यांना पात्र केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती कालच पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल यांची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 705 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7 हजार 880 परीक्षार्थी हे अपात्र असल्याचे समोर आले आहे.
