घोटावडेला पोलिसांत फिर्याद : पोलीस आणि ट्रेकर्सकडून बाळाच्या मृतदेहाचा घेतला जातोय शोध
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं 6 दिवसांचं बाळ पुण्यातील ताम्हिणी घाटात फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चुलत भावाशी आलेल्या शरीर संबंधातून जन्माला आलेले बाळ नातेवाईकांच्या दबावामुळे घाटात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. ज्याच्यापासून बाळ झाले त्यानेच हे 6 दिवसांचे बाळ फेकून दिले. आता पोलीस आणि ट्रेकर्सच्या मदतीने त्या बालकाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले की, जन्मदात्या बाळाची आई मंगल पवार ही पुण्यातील घोटवडे भागात गोडांबेवाडी गावात मजुरी करते. तिच्या पतीचे निधन झाले असून, पहिल्या पतीपासून तिला एक मुलगी आहे. मात्र, गोडांबेवाडीत मंगलच्या सोबतच मजुरी करणाऱ्या सचिन चव्हाण या चुलत भावाशी तिचे शारीरिक संबंध आले. त्या संबंधातून तिला मुलगा झाला. परंतु, ही गोष्ट तिच्या कुटुंबाला सहन झाली नाही.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील चव्हाण कुटुंब 5 तारखेला गावाला जायचे आहे, असं सांगून मंगल पवारला कारमधे घेऊन तिचे चुलत भाऊ संजय चव्हाण, नितिन चव्हाण, अजय चव्हाण आणि सचिन चव्हाण हे निघाले होते. पण, ताम्हीणी घाटातील दरी पुलाजवळ गाडी आली असता, ज्याच्यापासून बाळ झाले होते त्या सचिन चव्हाणने मंगल पवारच्या हातातून बाळ खेचून घेतले आणि ते दरीत फेकुन दिले. या दरम्यान मंगल पवार आणि त्यांच्या मुलीला कारमध्ये लॉक करुन ठेवले होते. मंगल पवारने घोटवड्याला परत आल्यानंतर या घटनेबाबत पोलिसांत तक्रार केली. यानंतर बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.