हडपसर पोलिसांत फिर्याद : २६ फेब्रुवारी २०२२ पासून घडला हा प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देऊन शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २६ फेब्रुवारी २०२० पासून आजपर्यंत घडला आहे.
याप्रकणी खेड तालुक्यातील ३३ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ऋषीकेश आप्पा भोसले (वय ३३, रा. हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ऋषीकेश भोसले हा सातारा येथील गुडविल वेल्थ मॅनेजमेंट या कंपनीचा सबब्रोकर आहे. त्याने हडपसर येथे कार्यालय सुरु केले आहे. तेथे त्याने फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण दिले. शेअर बाजारात रक्कम गुंतवणुक केली तर तुम्हाला मोठा परतावा देतो, असे आश्वासन दिले. त्यांचे डिमेंट अकाऊंट उघडून दिले. शेअर मार्केटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अकाऊंटवर ९ लाख ९६ हजार ९८५ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. आपल्या आर्थिक फायदा करण्यासाठी व गैरउद्देशाने त्यांचा विश्वास संपादन करुन आधारकार्ड, फोटो, पॅनकार्ड, बँक चेक, ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट, फोन नंबर, ई मेल आयडी, सहीचा फोटो हे कागदपत्रे घेतली. त्यांच्याकडून ९ लाख ९६ हजार ९८५ रुपये घेऊन विश्वास संपादन करण्यासाठी नाममात्र रक्कम परतावा म्हणून देऊन त्यांची ९ लाख ९६ हजार ९८५ रुपयांची फसवणूक केली आहे.