लोणी पोलिसांची कारवाई : कवडीपाट टोलनाक्याजवळील अंधाराचा फायदा घेत चौघे पळाले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लोणी काळभोर येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पुणे–सोलापूर महामार्गावरील कवडीपाट येथे अंधारात एकत्र आलेल्या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अंधाराचा फायदा घेत चौघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला.
कुणाल नारायण जाधव (वय २२, रा. काळेपडळ, हडपसर), ऋषीकेश राजेंद्र बरडे (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज), विकी धनंजय म्हस्के (वय २९, रा. कोरेगाव), तेजस ऊर्फ भैया धनंजय म्हस्के (वय २६), केतन गौरव कोंढरे (वय १९, रा. त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ), पूर्वेश शशीकांत सपकाळे (वय २२, रा. फुरसुंगी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार पृथ्वीराज संजय कांबळे (रा. कात्रज), निखील मारुती शिंदे (रा. पापळ वसाहत, बिबवेवाडी), अभिषेक बबन गव्हाणे (रा. गंगाधाम) आणि सोनु राठोड हे चौघे पळून गेले. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष मारुती होले यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पथक पहाटे गस्त घालत होते. पुणे – सोलापूर महामार्गावरील कवडीपाठ येथील टोलनाक्याजवळ असलेल्या हॉटेल तुळजाभवानीच्या बाजूला रस्त्यालगत अंधारात काही जण थांबल्याचे पोलिसांना समजले. मात्र, पोलिसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन चौघे जण पळून गेले. पोलिसांनी ६ जणांना पकडले. त्यांची झडती घेतली असता आरोपीकडे कोयता, मिरची पुड व बदलण्यासाठी कपडे आढळून आले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर माळीमळा येथील राजेंद्र पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते एकत्र आल्याची त्यांनी कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक महानोर अधिक तपास करीत आहेत.
