विमानतळ पोलिसांची कारवाई : परदेशी मुलीसह चार मुलींची सुटका
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या कारवाईत परदेशी मुलीसह इतर राज्यातील एकूण 4 मुलींची सुटका केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.2) साकोरेनगर परिसरात केली.
विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना साकोरेनगर परिसरात एक व्यक्ती खासगी वाहनातून काही मुलींना वेश्या व्यवसायासाठी घेऊन फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपी एजंट मुलींना घेऊन आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एजंटला ताब्यात घेतले. तर त्याच्या ताब्यात असलेल्या उझबेकिस्तान, नेपाळ, दिल्ली आणि मुंबई येथील मुलींची सुटका केली. तसेच त्याच्याकडून 5 हजार 192 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी ग्राहकांकडून मिळणारी आर्धी रक्कम स्वत: घेत होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, महिला पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन, पोलीस नाईक प्रदीप मोटे, गणेश गायकवाड, पोलीस शिपाई रुपेश तोडेकर, कांबळे, बुऱ्हाडे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
