पुणे पोलीस : ३०५९ सराईतांची तपासणी; ७२२ गुन्हेगार पकडले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन बुधवारी (दि.2) रात्री 11 ते गुरुवारी (दि.3) मध्यरात्री एक या कालावधीत राबवण्यात आले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 3059 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून, त्यापैकी 722 गुन्हेगार मिळून आले आहेत. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 5 हजार 100 रुपयांचे 17 कोयते, 4 हजार रुपयांच्या 5 तलवारी जप्त करुन 22 आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेने 13 आणि पोलीस स्टेशनने 9 असे एकूण 22 केसेस दाखल केले आहेत.
गुन्हे शाखा युनिट-२ने लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा विठ्ठल भाले (वय-21 रा. मु.पो. भवानीनगर, बारामती, सध्या पुणे) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीची ज्युपिटर दुचाकी जप्त केली आहे.
गुन्हे शाखा युनिट तीन-३च्या पथकाने हवेली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सनी नरेश जैसवाल (वय-33 रा. धनगर वस्ती, देवाची उरळी) याला अटक करुन हवेली पोलिसांच्या ताब्यात दिले.
तसेच युनिट-४ने कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सलमान फारुक कुरेशी (वय-22 रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक केली.
युनिट-६च्या पथकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी संतोष उर्फ विलास कचरु एडके (वय-35 रा. वडकी) याला अटक केली आहे.
खंडणी विरोधी पथाकाने कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी वसीम सलीम पटेल (वय-40 रा. कोंढवा खुर्द) याला अटक करुन 80 हजार रुपये किमतीच्या 2 मोपेड बाईक जप्त केल्या आहेत.
लोणीकंद पोलीस ठाण्यातील तपास पथकाने रांजणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी आर्यन पवार (वय-19 रा. वाघोली), प्रशांत उर्फ नानेश काळुराम उर्फ काळ्या (वय-20 रा. करडे, ता. शिरुर) यांना अटक करुन पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
लोणीकंद पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी समाधान निवृत्ती साबळे (वय-27 रा. वाघोली) याला अटक केली आहे.
तसेच चतु:श्रृंगी पोलिसांनी दाखल असलेल्या गुन्ह्यातील तीन आरोपी तन्मय राजु शितोळे, निकेश रघुनाथ शेलार, निखील प्रकाश डोंगरे यांना अटक केली आहे.
पोलीस स्टेशनने मुंबई प्रोव्हिबिशन ॲक्ट अंतर्गत ४ केसेस दाखल करुन 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीआरपीसी कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत 65 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच 479 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली.
नाकाबंदी कारवाईमध्ये 741 संशयित वाहन चालकांना चेक करुन 22 जणांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेने 693 संशयित वाहन चालकांना चेक करुन 49 दुचाकी, 15 तीन चाकी, 27 चारचाकी अशा एकूण 91 जणांवर कारवाई केली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ सागर पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ पौर्णिमा गायकवाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त वाहतुक विभाग राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले.
