स्वतःचा चौक सोडून टिळक रोडवरील पुरम चौकात गाड्या अडवून करत होते कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : टिळक रोडवरील वेगवेगळ्या चौकात कर्तव्यावर नेमणूक असताना ती जागा सोडून पुरम चौकात घोळक्याने थांबवून दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या तिघा वाहतूक पोलिसांवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी हा आदेश दिला आहे.
पोलीस हवालदार संतोष चंद्रकांत यादव, पोलीस अंमलदार बालाजी विठ्ठल पवार आणि मोनिका प्रविण करंजकर/लांघे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, हवालदार संतोष यादव, पोलीस अंमलदार बालाजी पवार आणि मोनिका करंजकर/लांघे यांची खडक वाहतूक विभागात नियुक्ती करण्यात आली होती.
१५ मे रोजी संतोष यादव यांना एस. पी. कॉलेज चौक, बालाजी पवार यांना हिराबाग चौक आणि मोनिका करंजकर यांना भावे चौक येथे ड्युटी देण्यात आली होती. मात्र हे तिन्ही ठिकाणे सोडून ते पुरम चौकात एकत्र आढळून आले.
तेथे वाहतूक नियमन न करता, वाहने थांबवून त्यांच्यावर कारवाई करत असल्याचे आढळले. वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक नियमन करणे, वाहतूक कोंडी होऊ न देणे अशा प्रकारच्या सुचना व आदेश देण्यात आले असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
त्यांच्या या कसुरीबद्दल त्यांना ५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यावर त्यांनी दिलेला खुलासा अंशतः समाधानकारक आढळला. त्यामुळे त्यांच्या शिक्षेत बदल करून त्यांना दीड हजार रुपये दंडाची शिक्षा पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सुनावली आहे.
